लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बोरिवली स्टेशनसमोर फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यांच्यावर पोलिस किंवा महापालिका अधिकारी कारवाई करत नाहीत. हे फार मोठे रॅकेट आहे. कितीही दवाब आला तरी ऐकणार नाही. प्रचारादरम्यान अनेक भगिनींनी ‘फेरीवाला मुक्त बोरिवली’ हवी अशी मागणी केली होती. त्यांची मागणी पूर्ण करणारच आहे. प्रसंगी नागरिकांना एकत्र घेऊन माझे कार्यालय रस्त्यावर थाटेन. फेरीवाला, अतिक्रमण मुक्त बोरिवली याच कामाला पहिले प्राधान्य असेल, अशी ग्वाही बोरिवलीचे भाजप आ. संजय उपाध्याय यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत दिली. संपादक अतुल कुलकर्णी यांनी आ. उपाध्याय यांचे स्वागत केले.
बांगलादेशी यांच्या विळख्यातून बोरिवलीला कसे मुक्त करणार? बांगलादेशाच्या दोन जिल्ह्यांतील लोक आपल्या कुटुंबासह येथे येऊन राहत आहेत. त्यांची बोगस कागदपत्रे बनविली जातात. कमी पैशांत कामे करण्यास ते तयार होतात. त्यामुळे मतदारसंघात जिथे जिथे लहान-मोठी कामे सुरू आहेत तेथील मजूर, कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत, त्याची यादी मागविली आहे. त्यांचे पोलिसांकडून व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे. तसेच, येत्या अधिवेशनामध्ये याविरोधात आवाज उठवून बोगस कागदपत्रे बनविणारे जे कोणी आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी करणार आहे.
गेल्या वीस वर्षांपासून पुनर्विकासाचे प्रकल्प रखडले आहेत त्याचे काय? मतदारसंघात अनेक पुनर्विकासाचे प्रकल्प राखडले आहेत. जेव्हा नागरिक विकासकाकडे जातात तेव्हा विकासक त्यांना विकण्यात येणारे चांगले घर दाखवतो; पण त्यांच्यासाठी बनविले जाणारे रिहॅबचे घर दाखवत नाही. काही ठिकाणी विकासक अनेक सुविधा देत नाहीत त्यामुळे अनेकांची फसवणूक होते. सामान्य व्यक्ती आयुष्यात एकदाच घर घेतो तेव्हा त्याची फसवणूक होऊ नये. त्याला त्याचे घर मिळावे, याकडे जातीने लक्ष देणार आहे.
आरोग्य व्यवस्थेकडे कसे पाहता? बोरिवलीमध्ये रात्री ८ नंतर कुणाला हार्ट अटॅक आला तर त्याला न्यायचे कुठे? हा प्रश्न निर्माण होतो. बोरिवलीचा विस्तार झाला; पण त्या प्रमाणात कॉलेज आणि आरोग्याच्या सुविधा झाल्या नाहीत. सरकारचे कूपर आणि खासगी कोकिळाबेन ही दोन रुग्णालये आहेत; पण ती देखील लांब आहेत. त्यामुळे येथे हॉस्पिटलची नितांत गरज आहे. यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
फेरीवाल्यांवर जर कारवाई होणार नसेल तर मी आणि बोरिवलीकर फुटपाथवर दुकाने टाकू. अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तर माझ्यावरही ते कारवाई करू शकत नाहीत. आपल्या या भूमिकेमुळे आपल्याच पक्षातील लोक नाराज होत असतील तरी आपण त्याची पर्वा करणार नाही. बोरिवलीमध्ये रोहिंगा आणि बांगलादेशी यांनी जास्त अतिक्रमण केले आहे. ते रस्त्यावरही खुलेआम दारू पितात. एखादी मुलगी अशा रस्त्यावरून जात नाही. त्यामुळे पालिका आणि पोलिसांची बैठक घेऊन फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि रस्त्यावर दारू पिणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. डिसेंबरपर्यंत कारवाई झाली नाही तर स्वतः रस्त्यावर उतरेन. कोणतीही तडजोड करणार नाही.