Join us  

'आदित्य ठाकरे' तर माझ्यासाठी किरकोळ बाब, बिचकुलेंना विजयाचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 5:38 PM

वरळी मतदार संघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अभिजीत बिचुकले निवडणूक लढवणार आहेत

मुंबई - ठाकरे घराण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घरातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरेनिवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. वरळी मतदारसंघातून निवडणूक लढविणारे आदित्य ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंना आव्हान देणार आहेत. बिचुकले यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.

वरळी मतदार संघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अभिजीत बिचुकले निवडणूक लढवणार आहेत. बिचुकले यांनी याआधी विधानसभेच्या 288 जागा लढणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न मी स्वत: पंतप्रधान होऊन पूर्ण करुन दाखवेन असं म्हटलं होतं. साताऱ्यातील नागरिकांनी शरद पवार यांना मोठं केलं असून मलाही सातारकर मोठं करतील असा अभिजीत यांनी विश्वास व्यक्त केला होता. त्याचप्रमाणे शरद पवारांना देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, त्यामुळे त्यांचे हे अपूर्ण राहिलेले स्वप्न मी स्वत: पंतप्रधान होऊन पूर्ण करुन दाखवेन असंदेखील अभिजीत बिचुकलेंनी यावेळी सांगितलं होतं.

आदित्य ठाकरेंच्या आव्हानबद्दल विचारले असता, आदित्य हा माझ्यासाठी युवराज वगैरे कुणीही नाही. छत्रपती उदयनराजेंना मी आव्हान देतो, तर छत्रपतींची प्रतिमा वापरुन हे मोठे झालेले आहेत. छत्रपतींच्या 13 व्या वंशजांना मी गेल्या 20 वर्षांपासून विरोध केलाय. त्यामुळे आदित्यला मी किरकोळ बाब समजतो. बिग बॉसमधून मुंबई नगरीशी माझं जवळीच नातं जडलं आहे. आनंद चव्हाण यांनी मला बिग बॉसमध्ये आणलं होतं. याच बिग बॉसमधून मी बाहेर पडलो, तेव्हा मुंबईकरांनीच मला ट्रेंडिंग ठेवलं. त्यामुळे मुंबईकरांची सेवा करण्यासाठी मुंबईला आलोय, असं अभिजीत बिचकुलेंनी म्हटलंय. 

ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे. वरळीतून आदित्य यांना उमेदवारी मिळाल्याने त्याविरोधात मनसे, आघाडीने त्या तोडीचा उमेदवार दिला नव्हता. मात्र, आता वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या या यादीत वरळीतून माजी पोलीस अधिकाऱ्याला उमेदवारी देण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला आहे. गौतम गायकवाड असे उमेदवाराचे नाव आहे. गायकवाड हे माजी पोलीस अधिकारी आहेत.

टॅग्स :अभिजीत बिचुकलेआदित्य ठाकरेशिवसेनावरळीविधानसभा निवडणूक 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019