मुंबई : इंडिगो दुबई-मुंबई विमानाच्या शौचालयात सिगारेट ओढल्याच्या आरोपाखाली एका बांगलादेशी नागरिकाला बुधवारी अटक करण्यात आली आहे. एका आठवड्यात इंडिगोच्या फ्लाइटमध्ये प्रवाशाने धूम्रपान केल्याची ही दुसरी घटना आहे.
कावसार हुसेन (२७) हा कामासाठी दुबईला गेला होता, जो मंगळवारी इंडिगोच्या ६ ई-१४५६ या फ्लाइटने मुंबईला (दुबईहून) येत होता. रात्रीनंतर त्याची ढाक्यासाठी कनेक्टिंग फ्लाइट होती. प्रवासादरम्यान, रात्री १२.४५ च्या सुमारास मुख्य केबिन अटेंडंट रेश्मा शेख (२७) यांच्या लक्षात आले की, सीट ८ डी (हुसेन) मधील प्रवासी बाथरूममध्ये गेला होता. तो त्याच्या जागेवर परतला नव्हता. बराच वेळ वाट पाहून शेख मग लॅव्हेटरीमध्ये गेल्या आणि त्यांनी दरवाजा ठोठावला. काही वेळाने हुसेन बाहेर आला; मात्र त्याने दार उघडल्यावर आतून धूम्रपानाचा उग्र वास येत होता. त्यांनी बाथरूम तपासले असता टॉयलेटच्या भांड्यात अर्धा जळलेला सिगारेटचा तुकडा दिसला.
याबाबत त्यांनी हुसेनला विचारणा केली तेव्हा टॉयलेटमध्ये धूम्रपान केल्याचे त्याने कबूल केले. तसेच १२ सिगारेटचे पाकीट आणि एक लायटर त्याने दिल्याचे शेख यांनी एफआयआरमध्ये दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
१) त्यानंतर शेख यांनी पायलटला माहिती दिली आणि विमान मुंबईत उतरल्यानंतर हुसेनला सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
२) दरम्यान, ५ मार्च रोजीही दिल्ली-मुंबई इंडिगो विमानातील ४२ वर्षीय प्रवाशाला सहार पोलिसांनी फ्लाइटच्या स्वच्छतागृहात विडी ओढल्याबद्दल अटक केली होती.
३० हजारांचा ठोठावला दंड -
हुसेन याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून, त्याला ३० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तो सध्या तुरुंगात असून, बांगलादेशातील त्याच्या कुटुंबीयांना त्याच्या अटकेची माहिती देण्यात आली आहे, असे सहार पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.