धुरांच्या रेषा विरणार; पश्चिम रेल्वेवर विद्युतीकरण पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 08:55 IST2025-04-03T08:55:37+5:302025-04-03T08:55:52+5:30

Western Railway: पश्चिम रेल्वेने संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरणाचे काम ३१ मार्चला पूर्ण केले आहे. राजकोट भागातील शेवटच्या टप्प्यातील विद्युतीकरण पूर्ण झाल्याने आता मुंबईपासून गुजरातच्या शेवटच्या टोकापर्यंत डिझेल गाड्यांचा तुलनेत वेगाने धावणाऱ्या विद्युत ट्रेन चालविणे शक्य होणार आहे.

Smoke lines will disappear; electrification on Western Railway complete | धुरांच्या रेषा विरणार; पश्चिम रेल्वेवर विद्युतीकरण पूर्ण

धुरांच्या रेषा विरणार; पश्चिम रेल्वेवर विद्युतीकरण पूर्ण

 मुंबई - पश्चिम रेल्वेने संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरणाचे काम ३१ मार्चला पूर्ण केले आहे. राजकोट भागातील शेवटच्या टप्प्यातील विद्युतीकरण पूर्ण झाल्याने आता मुंबईपासून गुजरातच्या शेवटच्या टोकापर्यंत डिझेल गाड्यांचा तुलनेत वेगाने धावणाऱ्या विद्युत ट्रेन चालविणे शक्य होणार आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.  त्याचबरोबर विविध उपक्रमांमुळे गाड्या ९५ टक्के वेळेवर धावत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 

रेल्वेच्या विद्युतीकरणाला नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाली असून, पश्चिम रेल्वेनेही संपूर्ण मार्गाचे १०० टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्ट साध्य केले आहे. मुंबई उपनगरातील रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण १९२८ मध्ये झाले होते. आता संपूर्ण मार्ग विद्युतीकरण झाल्याने मुंबई ते गुजरातदरम्यान असलेल्या ६६१ स्थानकांवर विद्युत इंजिनद्वारे 
गाड्या चालवणे शक्य होणार आहे,  असे  पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

५८० मेल-एक्स्प्रेस, १,४०६ लोकल
पश्चिम रेल्वेवर दररोज ५८० मेल-एक्स्प्रेस आणि १,४०६ लोकल धावत असून, त्यातून ३.६३ दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. तसेच रोज १०५ मेट्रिक टन मालाची वाहतूक होते. आतापर्यंत यासाठी डिझेल आणि विद्युत गाड्यांचा वापर होत होता. मात्र, पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात विद्युत गाड्यांची संख्या जास्त असून, डिझेल इंजिन वापर प्रामुख्याने दक्षिण सारख्या राज्यांतून येणाऱ्या गाड्यांसाठी केला जातो. डिझेलमुळे होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने पश्चिम रेल्वे प्रयत्नशील आहे. 

मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा वक्तशीरपणा ९५ टक्क्यांवर 
पश्चिम रेल्वेवरील वक्तशीरपणा सुधारण्यासाठी प्रशासनाने वेगमर्यादा रद्द करणे, रेल्वे मार्गाची देखभाल-दुरुस्ती करणे यासारख्या उपाययोजना केल्या आहेत. तसेच विद्युतीकरण १०० टक्के पूर्ण झाल्याने वेगवान इलेक्ट्रिक इंजिनद्वारे वक्तशीरपणा वाढविण्यासाठी मदत झाली आहे.
धोक्याच्या ठिकाणी किंवा अत्यावश्यक ठिकाणी मेल, एक्स्प्रेससाठी वेग मर्यादा आखली आहे. परंतु, या ठिकाणी पायाभूत सुविधा वाढवून, वेगमर्यादा रद्द केली आहे.  त्यासोबतच पश्चिम रेल्वेने २०२४-२५ आर्थिक वर्षात १४० उड्डाणपूल तयार केले आहेत. त्यामुळे रस्ते वाहतुकीतील अडथळे दूर झाले असून, वक्तशीरपणा राखण्यास मदत झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Smoke lines will disappear; electrification on Western Railway complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.