Join us

कोरोनाबाधितांना धुराचा धोका; काळजी घेण्याचे आवाहन, तज्ज्ञांनी दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 05:38 IST

CoronaVirus News in Mumbai : या वर्षी कोरोनाला हरविण्यासाठी दिवाळी पर्यावरणपूरक साजरी करा, असे आवाहन पर्यावरण क्षेत्रात काम करीत असलेल्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

मुंबई : रुग्णांची संख्या कमी होत असली तरीदेखील नियमांचे उल्लंघन झाल्यास कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोरोना बाधितांना होणारा धुराचा धोका लक्षात घेऊन श्वसन विकारतज्ज्ञांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. शिवाय, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवकांनीही पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यास सामान्यांना सांगितले आहे. दिवाळीत फटाके फोडल्यास त्याचा त्रास कोरोना रुग्णांसह नागरिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.  या वर्षी कोरोनाला हरविण्यासाठी दिवाळी पर्यावरणपूरक साजरी करा, असे आवाहन पर्यावरण क्षेत्रात काम करीत असलेल्या कार्यकर्त्यांनी केले आहे. कोरोनाला आळा घालण्याबाबत प्रशासनाकडून उल्लेखनीय पावले उचलली जात आहेत. असे असले तरी कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना फटाक्यांच्या धुराचा मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो. कारण कोरोना रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. अशावेळी त्यांना फटाक्यांतून निघणाऱ्या विषारी धुराचा त्रास होऊन जीव धोक्यात येऊ शकतो.  फटाके फोडू नयेत. ध्वनी आणि वायुप्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. अमित देशपांडे यांनी सांगितले, कोरोनामुक्त झाल्यानंतरही रुग्णांना रिकव्हर होण्यास बराच कालावधी लागतो. त्यामुळे अशक्तपणा, अस्वस्थतेतून सावरण्यासाठीही या रुग्णांना वेळ लागतो आहे, म्हणूनच त्यांचा त्रास शारिरीक व मानसिकरित्या वाढू नये यासाठी ही दिवाळी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यात यावी. कोरोना रुग्णांनाच नव्हे तर, कोणालाच ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात यावी; यासाठी काम सुरू केल्याचे मुंबईतल्या पर्यावरणवादी मिली शेट्टी यांनी सांगितले. समाजमाध्यमांचाही यासाठी वापर करण्यात येत असून, अधिकाधिक नागरिकांपर्यंत हा संदेश पोहोचविला जात आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई