धूर, दाट धुके अन् धुळीने मुंबईकरांच्या फुप्फुसांत होतेय ‘घरघर’; श्वसनविकारांची समस्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 09:35 IST2025-10-21T09:34:15+5:302025-10-21T09:35:01+5:30
सूर्योदयानंतरच बाहेर पडा

धूर, दाट धुके अन् धुळीने मुंबईकरांच्या फुप्फुसांत होतेय ‘घरघर’; श्वसनविकारांची समस्या
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबईच्या हवेत गेल्या काही दिवसांत झालेला बदल आता आरोग्यावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर ‘ऑक्टोबर हीट’ची झळ बसत आहे. सकाळी धुके, वाहनांचा धूर, बांधकामातील धूळ, दुपारी वाढते तापमान आणि रात्रीची दमट हवा या सगळ्यांचा परिणाम आता नागरिकांच्या फुप्फुसांवर होऊन श्वसनविकार होण्याची शक्यता तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
या बदललेल्या वातावरणामुळे काही नागरिकांमध्ये ताप, सर्दी, खोकला, घसादुखी आणि दम लागणे ही लक्षणे दिसू लागली आहेत. काही ठिकाणी नागरिक स्वतःच व्हायरल झाले असल्याचे सांगून सर्दी-खोकल्याने त्रस्त असल्याचे चित्र दिसत आहे. डॉक्टरांच्या मते, हवेत वाढलेले प्रदूषण, तापमानातील चढ-उतार आणि व्हायरल संसर्ग यामुळे हा त्रास अधिक वाढतो आहे.
अनेक जण ‘व्हायरल’ समजून औषधे घेतात. पण प्रदूषणामुळे खोकला, फुप्फुसातील दाह हा व्हायरल नसून ॲलर्जिक ब्रॉंनकायटिस, प्रदूषणजन्य श्वसनदाह असू शकतो, ज्यासाठी योग्य वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.
काय आहेत लक्षणं?
वारंवार खोकला किंवा छातीत घरघर असा आवाज येणे
थंडी वाजून ताप येणे
थोडे चालल्यानंतर दम लागणे
छाती भरल्यासारखी जडपणा जाणवणे
श्वास घेताना त्रास होणे
सध्याचे वातावरण विषाणूंसाठी पोषक आहे. त्यामुळे ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांना याचा त्रास होतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि ज्यांना अगोदरपासून सहव्याधी आहेत, त्यांना हा त्रास अधिक होतो. बांधकामे, औद्योगिक धूर, वाहनांचे उत्सर्जन, धुके या सगळ्यामुळे श्वसन व्यवस्थेवर ताण पडतो. अशावेळी खोकला, घरघर किंवा छाती जड होणे याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. - डॉ. जलील पारकर, श्वसनविकार तज्ज्ञ, लीलावती रुग्णालय.