गोरेगावचा ओबेरॉय जंक्शन परिसर झळकणार स्मार्ट सिग्नल पोल यंत्रणेने, पश्चिम उपनगरातील पहिली संकल्पना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 20:22 IST2021-04-28T20:20:55+5:302021-04-28T20:22:25+5:30
Smart Signal Pole System : ओबेरॉय मॉलमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीला येतात. त्यामुळे नेहमी पादचारी व वाहनांची गर्दी असते. अशावेळी सिग्नल पाहून रस्ता ओलांडणे कठीण असून अनेक वेळा सिग्नल दिसत नाही.

गोरेगावचा ओबेरॉय जंक्शन परिसर झळकणार स्मार्ट सिग्नल पोल यंत्रणेने, पश्चिम उपनगरातील पहिली संकल्पना
मनोहर कुंभेजकर
मुंबई - गोरेगाव पूर्व येथील जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग हा नेहमी एक गजबजलेला आणि मुख्य रस्ता आहे. आता या जंक्शनवर उपनगराचे पालक मंत्री व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून वरळी प्रमाणे बसवलेली पूर्ण प्रकाशित स्मार्ट सिग्नल पोल यंत्रणा येत्या 15 मे पर्यंत बसवली जाणार आहे. मुंबई महानगर पालिकेच्या पी दक्षिण वॉर्डतर्फे मुंबई सुशोभीकरण निधी अंतर्गत बसवण्यात येणारी अशा प्रकारची अद्यावत अशी ही पश्चिम उपनगरातील पहिलीच सिग्नल यंत्रणा आहे. यामुळे गोरेगावच्या ओबेरॉय जंक्शन परिसर आता पूर्ण प्रकाशित स्मार्ट पोल सिग्नल यंत्रणेने झळकणार आहे.
उद्यापासून या कामाला सुरुवात होणार असून येत्या 15 मे पर्यंत सदर काम पूर्ण होईल अशी माहिती शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद,दिंडोशी विधानसभेचे स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी लोकमतला दिली. ओबेरॉय मॉलमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीला येतात. त्यामुळे नेहमी पादचारी व वाहनांची गर्दी असते. अशावेळी सिग्नल पाहून रस्ता ओलांडणे कठीण असून अनेक वेळा सिग्नल दिसत नाही. त्यामुळे वरळी प्रमाणे बसवलेली पूर्ण प्रकाशित आद्यवत सिग्नल यंत्रणा बसवावी अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी पी दक्षिण वॉर्डचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्याकडे 4 मार्चच्या पत्राद्वारे केली होती.
पालिकेचे मेंटेनन्स खात्याचे सहाय्यक अभियंता ओंकार गिरकर यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही साईट विझिट केली असून सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यापासून या कामाला रितसर सुरुवात होईल. येथे प्रस्तावित असलेल्या सिग्नलच्या खांबावर स्मार्ट लाईट पोल सोबतच आमदार सुनील प्रभू यांच्या सूचनेप्रमाणे पूर्ण प्रकाशित यंत्रणेची तांत्रिक शक्यता आम्ही पडताळून पाहत असून येथे सदर अद्ययावत पूर्ण प्रकाशित स्मार्ट सिग्नल यंत्रणा लवकरच उभारली जाईल अशी माहिती गिरकर यांनी दिली. यामध्ये फिरता सीसीटीव्ही कॅमेरा, चार डेकोरेटिव्ह लाईट असतील. विशेष म्हणजे हा स्मार्ट डेकोरेटिव्ह पोल वायफायने जोडला जाईल आणि त्यांचे नियंत्रण पी दक्षिण वॉर्ड मध्ये असेल.जर पालिकेला कोणती महत्वाची सूचना नागरिकांना द्यायची असेल ती डिजिटलच्या माध्यमातून देता येईल अशी माहिती त्यांनी दिली.