मुंबई : मध्य रेल्वेच्यारेल्वे सुरक्षा दलाने मुंबईतील लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘स्मार्ट सखी’ उपक्रम राबवला. ‘स्मार्ट सखी’च्या माध्यमातून आरपीएफची टीम तत्काळ धावून येणार आहे. या उपक्रमांतर्गत व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून १७ हजारांहून अधिक महिला थेट आरपीएफच्या संपर्कात आहेत.
लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांना अनेकदा छेडछाड, विनयभंग यासारख्या घटनांना सामोरे जावे लागते. रेल्वे प्रशासनाने सीसीटीव्ही यंत्रणा उपाययोजना केल्या आहेत. सुरुवातीला या उपक्रमाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, मात्र सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता महिला यात सहभागी होत आहेत. सध्या ५६ व्हॉट्सॲप ग्रुप सक्रिय आहेत. त्यामध्ये १७ हजारांहून अधिक महिला प्रवासी जोडल्या आहेत.
महिलांसाठी बनला आधार ‘स्मार्ट सखी’ ग्रुप इतर हेल्पलाइनप्रमाणेच जलद मदत पुरवण्यात प्रभावी ठरत आहे. यामुळे महिला प्रवाशांना प्रवास अधिक सुरक्षित वाटू लागला आहे.
उपक्रमाच्या ग्रुपमध्ये सहभागी कसे व्हावे? सध्या ५६ व्हॉट्सॲप ग्रुप सक्रिय आहेत. हा उपक्रम फक्त मध्य रेल्वे मार्गावरील महिला प्रवाशांसाठी आहे. इच्छुक महिलांना रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून विनंती करावी लागते.
त्यानंतर त्यांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट केले जाते. महिलांना गरज पडल्यास या ग्रुपवर मदतीची विनंती करता येते, लोकेशन शेअर करता येते. यानंतर तातडीने सुरक्षा पुरवली जाते.
या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी ग्रुप सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, कल्याण, दिवा, बदलापूर, अंबरनाथ या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी हे ग्रुप तयार केले आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये आरपीएफच्या महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
प्रवासादरम्यान सुरक्षेसंदर्भात तक्रारी नोंदवण्यासाठी, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महिला प्रवासी या ग्रुपचा वापर करू शकतात. तक्रारी आल्यानंतर आरपीएफ तत्काळ मदतीसाठी पुढे सरसावते.