औषधे, उपकरणे खरेदीसाठीच्या ‘बंच बिड टेंडर’वर छोट्या वितरकांचा बहिष्कार; प्रक्रिया रद्दची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 09:59 IST2025-10-11T09:59:28+5:302025-10-11T09:59:39+5:30
केवळ मोठ्या वितरकांची सोय केल्याचा आरोप

औषधे, उपकरणे खरेदीसाठीच्या ‘बंच बिड टेंडर’वर छोट्या वितरकांचा बहिष्कार; प्रक्रिया रद्दची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत राज्यातील रुग्णालयासाठी उपकरणे आणि औषधे खरेदी करण्यासाठी बंच बीड टेंडर (समूह निविदा) काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे लहान वितरकांना या टेंडर प्रक्रियेत सहभागी होता येणार नसल्याने हा निर्णय मोठ्या वितरकांना डोळ्यासमोर ठेऊन घेण्यात आला आहे. त्यामुळे या टेंडर प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय लहान वितरकांनी घेतला आहे.
हाफकिनमधून होणाऱ्या खरेदीत दिरंगाई होत असल्याने तीन वर्षांपासून महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण सुरू करण्यात आले आहे. २०२५-२६ वर्षासाठी खरेदीकरिता टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बंच बीडमध्ये वितरकांना सर्व टेंडरवरील वस्तूंसाठी एकत्रितपणे किंमत सांगणे गरजेचे असते. मात्र लहान वितरकांन या टेंडरच्या बोली प्रक्रियेत सहभागी होण्यावर बंधने येतात. त्यामुळे महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाकडून राबविण्यात येणाऱ्या बंच बीड टेंडर प्रक्रियेचा निषेध करत बहिष्कार टाकण्यात आला आहे. त्या संदर्भांतील पत्र प्राधिकरणाला अनेक वितरकांना दिले आहे. तसेच ही प्रक्रिया रद्द करून नव्याने राबवावी असे त्या पत्रात नमूद केले आहे.