Join us

मान्सूनचे आस्ते कदम, १६ जून उजाडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 08:52 IST

३० मे रोजी केरळात येण्याची शक्यता

मुंबई : २७ मे रोजी केरळात दाखल होणारा मान्सून आता आस्ते कदम पुढे सरकत आहे. त्याचा वेग मंदावल्यामुळे तो ३० किंवा ३१ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता असून, मुंबई गाठण्यासाठी त्याला १६ जून उजाडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.  दरम्यान, मान्सूनची चाहूल लागल्याने राज्यातील हवामान पालटले असून, बहुतांश ठिकाणांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सद्य:स्थितीत पूर्वमोसमी पाऊस ज्या पद्धतीने महाराष्ट्रात व्हायला हवा तसा तो जाणवत नसून, ५ जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात काही भागांत पावसाचा शिडकावा होऊ शकतो. मान्सूची आगेकूच आस्ते कदम जरी सुरू राहिली तरी १३ ते २३ जून दरम्यान मध्यम स्वरूपाचा मोसमी पाऊस संपूर्ण महाराष्ट्र काबीज करू शकतो, असा अंदाज आहे. राज्यातील नागरिकांचे  आता पावसाकडे लक्ष लागले आहे. ढगाळ वातावरणामुळे काही पावसाचा शिडकावा होत आहे.  

पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेग वाढल्याने आणि केरळच्या किनाऱ्यावर ढगाळ वातावरण  निर्माण झाले आहे.  पुढील दोन ते तीन दिवसांत केरळमध्ये नैर्ऋत्य मोसमी पाऊस सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे दिसत असून, मान्सूनची उत्तरी सीमा आणखी पुढे सरकली आहे.- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग

केरळचा भूभाग व्यापवून पुढे वाटचाल करण्यासही मान्सूनला वेळ लागतो. त्यानंतर अरबी समुद्रातील पश्चिम किनारपट्टी काबीज करण्यासाठी त्याला ऊर्जा लागते. सह्याद्रीच्या पूर्वेला पूर्व मोसमी सरी कोसळणे गरजेचे असते. तरच संपूर्ण दक्षिण भारतातील द्विपकल्प कव्हर करून मान्सून पुढे झेपावेल, त्यानंतरच मान्सून मुंबईत दाखल होईल. यासाठी अरबी समुद्रात एखादी प्रणाली घडून येणे आवश्यक असते. - माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ 

मुंबईत घामाच्या धारापुढील काही दिवस मुंबईचे कमाल तापमान ३३ अंश राहील असा अंदाज आहे. शुक्रवारी मुंबईत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. अधूनमधून ढगाळ वातावरण होते; परंतु आर्द्रतेचे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक होते. त्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. २८ ते २९ मेकोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.३० ते ३१ मेदक्षिण कोकणात  तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

 

टॅग्स :मानसून स्पेशलपाऊसमुंबई