Mumbai: वांद्रे पूर्वेला स्कायवॉक पाडला; मात्र तो पुन्हा बांधणार कधी?

By सचिन लुंगसे | Updated: June 16, 2025 15:39 IST2025-06-16T15:34:58+5:302025-06-16T15:39:26+5:30

गेल्या कित्येक वर्षांपासून स्कायवॉकचे काम सुरू असल्याने नागरिकांना फुटपाथ नसल्याने रस्त्यावरून चालावे लागत आहे.

Skywalk demolished in Bandra East; but when will it be rebuilt? | Mumbai: वांद्रे पूर्वेला स्कायवॉक पाडला; मात्र तो पुन्हा बांधणार कधी?

Mumbai: वांद्रे पूर्वेला स्कायवॉक पाडला; मात्र तो पुन्हा बांधणार कधी?

सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: वांद्रे पूर्वेला बांधण्यात येत असलेल्या स्कायवॉकच्या खालील रस्ता मात्र खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ऐन पावसाळ्यात चालण्यासाठी मुंबईकरांना तारेवरची कसरत करावी लागते. दुर्दैव म्हणजे केवळ पावसाळा नाही तर वर्षाच्या बारामाही येथे हीच अवस्था असल्याने हा स्कायवॉक बांधून केव्हा पूर्ण होणार ? याची वाट येथील पादचारी आणि स्थानिक नागरिक बघत आहेत.

एमएमआरडीएच्या वतीने मुंबईतला पहिला स्कायवॉक वांद्रे पूर्वेला बांधण्यात आला. वांद्रे रेल्वे स्थानकातून पूर्वेकडील वांद्रे न्यायालयापर्यंत जाण्यासाठी या स्कायवॉकचा नागरिकांना मोठा फायदा होत होता. मात्र आता हा स्कायवॉक तोडून आता पुन्हा नवीन स्कायवॉक या जागी बांधला जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून स्कायवॉकचे काम सुरू असल्याने नागरिकांना फुटपाथ नसल्याने रस्त्यावरून चालावे लागत आहे.

न्यायालयासह महावितरणचे कार्यालय, एसआरएचे कार्यालय, पोलिस ठाणे येथून रेल्वे स्थानकापर्यंत जायचे म्हणजे नागरिकांना नकोसे झाले आहे. फुटपाथही धड नाही आणि रस्ताही धड नाही, अशी अवस्था या परिसराची आहे. एसआरएच्या कार्यालयानंतर लागणाऱ्या पोलिस ठाण्याच्या समोरून तर सातत्याने सांडपाणी वाहत असते. हे केवळ एका ठिकाणी नाही तर संपूर्ण मार्गावर हीच अवस्था आहे. 

वांद्रे पूर्वेला महारेरा, महापारेषण, एमएमआरडीए, एफडीए, म्हाडा, पीएफ, एसआरए आणि महावितरण या सरकारी कार्यालयांसोबतच कित्येक खासगी कंपन्या आणि कार्यालये आहेत. यातून लाखो नोकरदार सकाळी व सायंकाळी ओबडधोबड रस्त्यावरून प्रवास करत आहेत.- प्रशासकीय कार्यालयांचे हब

सकाळी व सायंकाळी वांद्रे पूर्वेला माणसांना नीट चालता येत नाही. रिक्षा, बेस्ट व इतर खासगी वाहनांची रस्त्यावर गर्दी असते. तर फुटपाथ चालण्यायोग्य नाहीत.- मनीष आचरेकर

रस्ता आणि फुटपाथवरील अनधिकृत पार्किंग ही अडचण आहे. यात फेरीवाले भर घालत आहेत. किमान चालण्यासाठी तरी फुटपाथ नीट असावा, ही अपेक्षा आहे.- आशिष त्रिवेदी 

पावसाळ्यात तर रस्ता आणि फुटपाथ असे दोन्हीकडून नीट चालता येत नाही. एक तर फुटपाथ नीट बांधा किंवा अनधिकृत पार्किंग काढून टाका. दोन्हीही नीट करता येत नसेल तर स्कायवॉक लवकर बांधा.- धवल दवे

Web Title: Skywalk demolished in Bandra East; but when will it be rebuilt?