महाराष्ट्राच्या गृहनिर्माण साठ्यात सहा लाख नवीन घरे जोडली जाणार; मुंबईत अनेक प्रकल्प सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 18:54 IST2025-10-27T18:54:32+5:302025-10-27T18:54:58+5:30
जपान सरकारच्या अर्बन रिनेसान्स एजन्सीच्या ग्लोबल अफेअर्स विभागाच्या शिष्टमंडळाने सोमवारी वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयास भेट दिली

महाराष्ट्राच्या गृहनिर्माण साठ्यात सहा लाख नवीन घरे जोडली जाणार; मुंबईत अनेक प्रकल्प सुरू
मुंबई - बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्प, मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प, जी.टी.बी. नगर येथील पंजाबी कॉलनी, पत्राचाळ, अभ्युदय नगर, जोगेश्वरीतील पूनम नगर, अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगर, वरळी आदर्श नगर आणि वांद्रे रिक्लेमेशन पुनर्विकास प्रकल्प असे अनेक प्रकल्प अंमलबजावणीच्या किंवा नियोजनाच्या टप्प्यात असून, या सर्व प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण साठ्यात सुमारे सहा लाख नवीन घरे जोडली जाण्याची अपेक्षा म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केली.
जपान सरकारच्या अर्बन रिनेसान्स एजन्सीच्या ग्लोबल अफेअर्स विभागाच्या शिष्टमंडळाने सोमवारी वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयास भेट दिली. या शिष्टमंडळाने म्हाडातर्फे राबविण्यात येत असलेल्या गृहनिर्माण, पुनर्विकास व क्लस्टर विकास प्रकल्पांचा तसेच ग्रोथ हब प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी संजीव जयस्वाल बोलत होते. अर्बन रिनेसान्स एजन्सीच्या ग्लोबल अफेअर्स विभागाचे संचालक ओकामुरा टोमोहीतो यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ आले आहे. या निमित्ताने भारत आणि जपान या दोन्ही देशांदरम्यान परवडणाऱ्या दरातील गृहबांधणी आणि शहरी पुनर्विकास क्षेत्रात भावी सहकार्याच्या संधींचा शोध घेण्यास महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले.
संजीव जयस्वाल म्हणाले, म्हाडा ही परवडणार्या दरातील गृहनिर्मिती करणारी देशातील अग्रगण्य संस्था आहे. म्हाडाचे विविध पुनर्विकास प्रकल्प मुंबईची क्षितिजरेषा बदलत असून नागरिकांना आधुनिक व सन्माननीय घरे उपलब्ध करून देत आहेत. बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्प जो मध्य मुंबईत राबविला जात आहे, यामुळे १६ हजार कुटुंबांना आधुनिक दोन बेडरूमची घरे विनामुल्य मिळणार आहेत. गोरेगाव येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पुनर्विकास प्रकल्प ठरणार असून सुमारे १,६०० चौरस फुटांची घरे त्यामध्ये दिली जाणार आहेत. जी.टी.बी. नगर येथील पंजाबी कॉलनी, गोरेगावमधील सिद्धार्थ नगर (पत्राचाळ), अभ्युदय नगर, जोगेश्वरीतील पूनम नगर, अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगर, वरळी आदर्श नगर आणि वांद्रे रिक्लेमेशन पुनर्विकास प्रकल्प असे अनेक प्रकल्प अंमलबजावणीच्या किंवा नियोजनाच्या टप्प्यात असून, या सर्व प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण साठ्यात सुमारे सहा लाख नवीन घरे जोडली जाण्याची अपेक्षा आहे.
म्हाडा भारताच्या शहरी परिवर्तनाचा मुख्य घटक बनत आहे आणि पुनर्विकास ही मुंबईतील गृहनिर्माण तुटवडा दूर करण्याची सर्वात प्रभावी उपाययोजना ठरली आहे. जपान सरकारद्वारा वित्तपुरवठा करण्यात आलेली अर्बन रिनेसान्स एजन्सी ही शहरी गृहनिर्माण क्षेत्रातील अनुभवी संस्था असून, महाराष्ट्राच्या गृहनिर्माण क्षेत्रात गुंतवणूक आणि सहकार्याची प्रचंड क्षमता उपलब्ध आहे, असेही जयस्वाल म्हणाले.
ओकामुरा टोमोहीतो म्हणाले, भारताच्या शहरी विकास उपक्रमांना जपानकडून सतत पाठिंबा दिला जाईल आणि मुंबईतील आगामी पुनर्विकास व क्लस्टर विकास प्रकल्पांमध्ये आमची सहकार्य करण्याची इच्छाही आहे.
५०० चौरस फुटांची घरे मोफत
शिष्टमंडळाने कामाठीपुरा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाबद्दलही विशेष रस दाखविला. हा प्रकल्प शंभर वर्षांहून अधिक जुन्या व मोडकळीस आलेल्या वसाहतींचे रूपांतर करून आधुनिक आणि भविष्याभिमुख शहरी परिसर निर्माण करणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे ८ हजार कुटुंबांना प्रत्येकी ५०० चौरस फुटांची घरे मोफत देण्यात येणार असून, त्या परिसराचा ऐतिहासिक वारसा जपला जाणार आहे.