Join us
Daily Top 2Weekly Top 5

सायन रेल्वे पुलावर २८ मार्चपासून हातोडा; वाहतूक व्यवस्थेत होणार बदल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 09:58 IST

दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने या काळात पूल बंद केला, तर ते अडचणीचे ठरेल, याकडे स्थानिकांनी लक्ष वेधले होते.

मुंबई : पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडणाऱ्या सायन येथील  पुलाचे पाडकाम २८ मार्चपासून सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रेल्वे प्रशासनाने मात्र अद्याप त्यास दुजोरा दिलेला नसला, तरी परीक्षांनंतर हा पूल पाडला जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.

दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने या काळात पूल बंद केला, तर ते अडचणीचे ठरेल, याकडे स्थानिकांनी लक्ष वेधले होते, तसेच या संदर्भात वाहतूक पोलिसांनीही रेल्वेला विनंती केली होती. त्यामुळे रेल्वे पुलाचे पाडकाम सुरू करण्यात आले नव्हते. २८ फेब्रुवारीच्या रात्रीपासून पूल बंद केला जाणार होता आणि त्यानंतर पुलाचे पाडकाम हाती घेतले जाणार होते. मात्र, लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रशासनात झालेल्या बैठकीत या पुलाचे पाडकाम पुढे ढकलण्यात आले.

असा असेल नवीन पूल -

नवीन पूल हा सिंगल स्पॅन सेमी-थ्रू गर्डर्स ४९ मीटर लांबीचा आणि २९ मीटर रुंदीचा आरसीसी स्लॅब पद्धतीचा असेल.मुंबई आयआयटीने स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये आताचा पूल  तोडून टाकण्याची आणि स्टील गर्डर व आरसीसी स्लॅबसह जुन्या पुलाच्या जागी नव्या पुलाची शिफारस केली होती.

१९१२ मध्ये पुलाचे बांधकाम -

१)  सायन रेल्वे पूल १९१२ मध्ये बांधण्यात आला आहे.

२) मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या बांधकामासाठी हा पूल पाडून नवीन पूल बांधला जाणार आहे.

३) २४ महिन्यांत नवीन पूल बांधून पूर्ण केला जाईल.

४) महापालिका आणि रेल्वे एकत्रित यासाठी खर्च करेल.

वाहतूक व्यवस्थेत बदल -

१) पूल पाडण्यात आल्यानंतर मुंबईला पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल होतील.

२) दोन्ही बाजूंकडील वाहनांना मोठा वळसा घालून मार्गक्रमण करावी लागेल.

टॅग्स :मुंबईरेल्वे