सायन पूल १५ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी खुला, एक भुयारी पादचारी मार्ग १५ दिवसांमध्ये सेवेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 13:24 IST2026-01-31T13:24:27+5:302026-01-31T13:24:54+5:30
Sion Bridge: सायन उड्डाणपुलाची पुनर्बांधणी सुरू असल्याने पादचाऱ्यांना पूर्व-पश्चिमेला ये-जा करणे सोयीचे व्हावे, यासाठी फूट ओव्हरब्रिज खुला केला आहे. सोबत दोन भुयारी पादचारी मार्गांपैकी एक मार्ग पूर्ण झाला असून, येत्या पंधरवड्यात तोही सुरू करण्यात येईल.

सायन पूल १५ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी खुला, एक भुयारी पादचारी मार्ग १५ दिवसांमध्ये सेवेत
मुंबई - सायन उड्डाणपुलाची पुनर्बांधणी सुरू असल्याने पादचाऱ्यांना पूर्व-पश्चिमेला ये-जा करणे सोयीचे व्हावे, यासाठी फूट ओव्हरब्रिज खुला केला आहे. सोबत दोन भुयारी पादचारी मार्गांपैकी एक मार्ग पूर्ण झाला असून, येत्या पंधरवड्यात तोही सुरू करण्यात येईल. तर, १५ जुलै २०२६ पर्यंत उड्डाणपुलाची सर्व कामे पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी सांगितले.
सायन उड्डाणपुलाच्या कामाची गुरुवारी बांगर यांनी पाहणी केली. या पुलाच्या रेल्वे हद्दीतील काम रेल्वे आणि पोहोच मार्ग, दोन पादचारी भुयारी मार्गांचे काम पालिका करीत आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील भुयारी मार्ग पूर्ण करण्यात आला असून, तो खुला झाल्यानंतर रेल्वे पुलाच्या पश्चिमेकडील पादचारी वाहतुकीची फेरआखणी करण्याची सूचना बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तर, अभियंत्यांनीही दररोज कार्यस्थळी उपस्थित राहावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पश्चिमेकडील कामाचे चार टप्पे
पश्चिमेकडील कामाचे चार टप्पे असून, येथील सर्व कामे ३१ मेपर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. रेल्वेकडून ३१ मेपर्यंत पूर्व बाजूकडील पोहोच रस्त्याचा ताबा पालिकेला मिळणे अपेक्षित आहे.
त्यामुळे उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी त्यानंतर आणखी काही कालावधी लागणार आहे. त्याचा विचार करता या पुलाची सर्व कामे १५ जुलैपर्यंत पूर्ण केली जातील व पूल वाहतुकीस खुला केला जाईल, असे बांगर यांनी नमूद केले.
रेल्वेकडून ३१ मेपर्यंत गर्डर
रेल्वे मार्गावरील जुन्या पुलाच्या उत्तरेकडील भाग पाडण्यात आला आहे. आता दक्षिणेकडील भागाचे निष्कासन सुरू आहे.
उत्तर दिशेच्या अर्ध्या बाजूवर गर्डर बसविल्यावर पूर्व बाजूचा अर्धा पोहोच रस्ता पालिकेच्या ताब्यात येईल. रेल्वेकडून शेवटचा गर्डर ३१ मेपर्यंत उभारण्यात येईल. मात्र, पूर्व बाजूची
कामे पूर्ण करण्यासाठी सुमारे ३० ते ४५ दिवस लागणार आहेत.