सायन अपघात; लोकलमधून पडलेल्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 01:27 IST2019-01-26T01:27:26+5:302019-01-26T01:27:32+5:30
गर्दीने भरलेल्या धावत्या लोकलमधून पडलेल्या तीन विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याचा सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सायन अपघात; लोकलमधून पडलेल्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
मुंबई : गर्दीने भरलेल्या धावत्या लोकलमधून पडलेल्या तीन विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याचा सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. फुलचंद यादव (१७) असे त्याचे नाव असून, तो चुनाभट्टी येथील संजय गांधी नगरचा रहिवासी होता. गुरुवारी सकाळी सायन-माटुंगा दरम्यान रुळाला तडे गेल्याने सायनमध्ये लोकलचे मार्ग बदलण्यात आले. परिणामी, झालेल्या गर्दीत रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला होता. त्यात तीन महाविद्यालयीन विद्यार्थी भुयारी भिंतीची धडक बसून पटरीलगत पडले होते.
त्यात फुलचंद यादव या अकरावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या डोक्याला गंभीर जखमी झाल्याने सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यापासून फुलचंदची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी फुलचंदचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुरुवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली. या अपघातात फुलचंदचे मित्रही जखमी झाले होते़ मात्र त्यांना गंभीर दुखापत झाली नव्हती़ त्यमाुळे ते बचावले़