सिंगापूर दिवास्वप्नच, एसआरएकडून १०० दिवसांच्या आराखड्याची मलमपट्टी, विविध प्रकल्प अद्यापही लाल फितीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 10:28 IST2025-02-16T10:24:53+5:302025-02-16T10:28:13+5:30

या प्रकल्पांच्या कामांना गती मिळावी म्हणून शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार प्राधिकरणाने मुख्यालयात मदत कक्षाची स्थापना करत कागदपत्रांच्या स्कॅनिंगवर जोर दिला आहे.

Singapore is just a daydream, SRA scraps 100-day plan, various projects still stuck in red tape | सिंगापूर दिवास्वप्नच, एसआरएकडून १०० दिवसांच्या आराखड्याची मलमपट्टी, विविध प्रकल्प अद्यापही लाल फितीत

सिंगापूर दिवास्वप्नच, एसआरएकडून १०० दिवसांच्या आराखड्याची मलमपट्टी, विविध प्रकल्प अद्यापही लाल फितीत

मुंबई : झोपड्यांवर नंबर टाकण्यापासून त्यांचा ड्रोन सर्व्हे आणि सॅटेलाइट मॅपिंग करण्यापर्यंतचा खटाटोप करणाऱ्या एसआरएला मुंबईतले मूठभर प्रकल्पही मार्गी लावता आलेले नाहीत. याचा परिणाम म्हणून वांद्रे येथील भारतनगर, सांताक्रूझ, अंधेरी आणि इतर ठिकाणचे बहुतांशी प्रकल्प लालफितीत अडकलेले आहेत.

या प्रकल्पांच्या कामांना गती मिळावी म्हणून शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार प्राधिकरणाने मुख्यालयात मदत कक्षाची स्थापना करत कागदपत्रांच्या स्कॅनिंगवर जोर दिला आहे. प्रत्यक्षात मात्र हा आराखडा म्हणजे प्रकल्पांतील रहिवाशांच्या डोळ्यांत धूळफेक असल्याची टीका गृहनिर्माण क्षेत्रातील अभ्यासकांनी केली आहे.

मुंबईतील १३ लाख ७९ हजार झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचे नियोजन आहे. त्यापैकी साडेपाच लाख झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

झोपड्यांमध्ये ६५ लाख लोकवस्ती

मुंबईतील झोपड्यांमध्ये सुमारे ६५ लाख नागरिक राहत आहेत. २०११ पूर्वीच्या झोपड्यांचे पुनर्वसन मोफत होत असले तरी नंतरच्या झोपडीधारकांकडून पैसे घेऊन त्यांना घर दिले जात आहे. आजही कित्येक एसआरए प्रकल्प पूर्ण झालेले नाहीत.

१०० दिवसांचा आराखडा झोपडीधारकांचे प्रश्न सोडविणारा असला पाहिजे. मदत कक्ष सुरू करून झोपडीधारकांचे प्रश्न सुटणार नाहीत. हा सगळा दिखाऊपणा आहे. अशाने मुंबई झोपडमुक्त होणार नाही. मुंबईचे शांघाय व सिंगापूर होणार नाही, असे झोपड्यांच्या प्रश्नांचे अभ्यासक प्रभाकर नारकर यांनी सांगितले.

धोरणात्मक निर्णयात बदल अपेक्षित

एसआरए प्रकल्प पूर्ण होण्यासाठी किंवा कामांना गती मिळावी, म्हणून शासनाने धोरणात्मक निर्णयात बदल करणे अपेक्षित आहे. एसआरएच्या कोणत्याही योजनेची माहिती घेण्यासाठी किंवा प्रकल्पासाठी मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांना शेवटपर्यंत पूर्ण माहिती मिळत नाही, अशी टीका गृहनिर्माण क्षेत्रातील अभ्यासक डॉ. सुरेंद्र मोरे यांनी केली.

बायोमेट्रिक सर्वेक्षणाला बहुतांश ठिकाणी विरोध

झोपड्यांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाला बहुतांश ठिकाणी विरोध झाला होता. एसआर नीट माहिती देत नसल्याने गोवंडीतील रहिवाशांनी त्याला विरोध केला होता.

आता येथील निम्म्या झोपड्यांचे सर्वेक्षण झाले असून, आजही सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.

दुसरीकडे एसआरएमध्ये येणाऱ्या नागरिकांची कामे झटपट व्हावीत, यासाठी एसआरएने मदत कक्ष तयार केला आहे.

या कक्षात दोन कर्मचारी नागरिकांना कोणत्या मजल्यावर, कोणत्या विभागात कोणत्या अधिकाऱ्याला भेटावे, याची माहिती देत आहेत. त्यामुळे नागरिकांची माहितीअभावी होणारी गैरसोय दूर होत आहे, असा दावा एसआरएने केला आहे.

Web Title: Singapore is just a daydream, SRA scraps 100-day plan, various projects still stuck in red tape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई