मिठी नदीतील गाळ आता महापे डंपिंग ग्राउंडऐवजी मुंब्रा येथील डंपिंग ग्राउंडवर टाकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 08:20 IST2025-06-01T08:19:44+5:302025-06-01T08:20:18+5:30

मिठी नदीच्या सफाईसाठी तीन भागांमध्ये विभागून कंत्राट देण्यात आले आहे

Silt from Mithi river will now be dumped at the dumping ground in Mumbra instead of Mahape dumping ground. | मिठी नदीतील गाळ आता महापे डंपिंग ग्राउंडऐवजी मुंब्रा येथील डंपिंग ग्राउंडवर टाकणार

मिठी नदीतील गाळ आता महापे डंपिंग ग्राउंडऐवजी मुंब्रा येथील डंपिंग ग्राउंडवर टाकणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वेळेआधीच सुरू झालेल्या पावसामुळे नदी-नाल्यातील गाळ पुन्हा त्याच ठिकाणी वाहून गेला आहे. त्यातच डंपिंग ग्राउंडवर पाणी साचून दलदल झाल्याने त्या ठिकाणी गाळ वाहून नेणारी वाहने अडकून पडत आहेत. त्यामुळे गाळ वाहून नेणारे डंपर चालक त्या ठिकाणी वाहने नेण्यास टाळाटाळ करू लागले  आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता  गाळ टाकण्यासाठी मुंबई महापालिकेने नव्या जागेचा पर्याय निवडला आहे. त्यानुसार मिठी नदीतील गाळ महापे डंपिंग ग्राउंडऐवजी मुंब्रा येथील डंपिंग ग्राउंडवर टाकण्यात येणार आहे.

मिठी नदीच्या सफाईसाठी तीन भागांमध्ये विभागून कंत्राट देण्यात आले आहे. कंत्राटदारांची निवड  झाल्यानंतर गाळ काढण्याच्या कामास सुरुवात झाली. गाळ बाजूला काढल्यानंतर तो पूर्णपणे सुकला की त्याची नोंद करून डंपरद्वारे महापे येथील डंपिंग ग्राउंडवर  टाकला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसाने तेथे मोठ्या प्रमाणात पाणी साचून दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे गाळ वाहून नेणारी वाहने तेथे रुतून बसण्याचे प्रकार घडू लागले आहेत. परिणामी,  डंपर चालक गाळ नेण्यास टाळाटाळ करत आहेत. अशात मिठीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर गाळ पडून आहे. मोठ्या पावसाला  सुरुवात झाल्यास हाही गाळ पुन्हा नदीत  वाहून जाण्याची भीती आहे. त्यामुळे त्याची तत्काळ विल्हेवाट लावणे गरजेचे बनले आहे.

गाळामुळे तापणार मुंब्य्रातील राजकारण

मिठी नदीच्या गाळामुळे मुंब्य्रातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. हा गाळ नेमका कुठे टाकणार याबाबत प्रशासकीय अधिकारीही अनभिज्ञ आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत मिठी नदीच्या गाळामुळे मुंब्य्रातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. मुंबईतील मिठी नदीतून निघणारा गाळ नवी मुंबईऐवजी मुंब्य्रात टाकण्याचा निर्णय प्रशासकीय स्तरावर घेण्यात आला आहे. हा गाळ सध्या राडारोडा टाकण्यात येत असलेल्या जलद मार्गाच्या बाजूच्या भूखंडावर  टाकण्यात येणार की अन्य ठिकाणी याबाबत स्थानिक रहिवाशांबरोबरच राजकीय नेत्यांत संभ्रम आहे.

मिठी नदीचा गाळ मुंब्य्रात कुठे टाकण्यात येणार आहे, याबाबत कुठलीही सूचना किंवा पत्र मिळाले नाही. त्यामुळे गाळ नेमका कुठे टाकणार याबाबत काहीही माहिती नाही.
-गणेश चौधरी, सहाय्यक आयुक्त, मुंब्रा प्रभाग समिती

Web Title: Silt from Mithi river will now be dumped at the dumping ground in Mumbra instead of Mahape dumping ground.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई