शत्रूची पाणबुडी कुठूनही शोधून उद्ध्वस्त करणार ‘सायलेंट हंटर माहे’; नौदलाच्या ताफ्यात सामील
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 08:46 IST2025-11-25T08:46:12+5:302025-11-25T08:46:42+5:30
Indian Navy News: भारतीय नौदलाच्या शीरपेचात माहे या पाणबुडीविरोधी आयएनएस युद्धनौकेमुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, सोमवारी ही युद्ध नौका नौदलाच्या ताफ्यात सामील झाली. पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर माहे सायलेंट हंटर म्हणून काम करणार आहे.

शत्रूची पाणबुडी कुठूनही शोधून उद्ध्वस्त करणार ‘सायलेंट हंटर माहे’; नौदलाच्या ताफ्यात सामील
मुंबई - भारतीय नौदलाच्या शीरपेचात माहे या पाणबुडीविरोधी आयएनएस युद्धनौकेमुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, सोमवारी ही युद्ध नौका नौदलाच्या ताफ्यात सामील झाली. पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर माहे सायलेंट हंटर म्हणून काम करणार आहे. खोल समुद्र असो वा उथळ पाणी शत्रूच्या पाणबुडीचा शोध घेऊन दिसताक्षणी तिचा वेध घेण्याची क्षमता माहेमध्ये आहे.
युद्ध नौकेचे कमिशनिंग लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी व वेस्टर्न नेव्हल कमांडचे ध्वजाधिकारी कमांडींग इन चिफ व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांच्या उपस्थितीत नौदल गोदीत करण्यात आले. देशातील पहिली माहे पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. क्रेस्टवर कलारीपयट्टूमधील उरुमी ही तलवार साकारण्यात आली आहे.
आधुनिक शस्त्रास्त्र, संवेदक (सेन्सोर्स), संवाद प्रणाली व प्रगत नियंत्रण तंत्रज्ञानाने ही नौका सज्ज आहे. दीर्घकाळ शाश्वत ऑपरेशन्स करण्याची क्षमता ही या जहाजाची वैशिष्ट्ये आहेत.
जहाजाची लांबी ७८.८ मीटर असून १,१५० टन वजन वाहून नेऊ शकते. पाणबुडीविरोधी १६ युद्ध नौका तयार होत आहेत. कोलकाताच्या जीआरएसई येथे व कोचीन शिपयार्डमध्ये यामधील प्रत्येकी ८ युद्ध नौका तयार होत आहेत. या सर्व युद्ध नौका ८० टक्के स्वदेशी असतील, अशी माहिती लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी दिली.