सिक्कीमचे राज्यपाल ओम माथूर म्हणजे निवडणुका जिंकण्याचे तंत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 10:23 IST2025-03-25T10:20:40+5:302025-03-25T10:23:57+5:30
राजस्थान ग्लोबल फोरमच्यावतीने माथूर यांचा भव्य सत्कार करण्यात आला

सिक्कीमचे राज्यपाल ओम माथूर म्हणजे निवडणुका जिंकण्याचे तंत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर म्हणजे निवडणुका जिंकण्याचे तंत्र आहे. त्यांच्यावर ज्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली, ती राज्ये त्यांनी जिंकल्याशिवाय सोडली नाहीत, मग ते महाराष्ट्र असो की नुकत्याच झालेल्या निवडणुकांमधील छत्तीसगड असो, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिक्कीमचे राज्यपाल माथूर यांच्याबाबत गौरवोद्गार काढले.
राजस्थान ग्लोबल फोरमच्यावतीने सोमवारी मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात माथूर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विजय दर्डा, आ. अभिमन्यू पवार, आ. संजय उपाध्याय, जोधपूरचे आ. अतुल भन्साळी तसेच फोरमचे मोतीलाल ओसवाल, पृथ्वीराज कोठारी, राकेश मेहता, घनश्याम मोदी, अभिनेते शैलेश लोढा यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत माथूरजी राज्याचे प्रभारी आणि मी प्रदेशाध्यक्ष होतो, त्यावेळी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत स्वतंत्र लढण्याचा निर्णय मोदी, शाह आणि माथूर यांनी घेतला. त्या निर्णयानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या बळामुळे राज्यात १०० पेक्षा अधिक जागा जिंकून आम्ही मोठा भाऊ ठरलो, त्यानंतर राज्यात सलग तीनवेळा १०० पेक्षा अधिक जागा केवळ माथूर यांच्या मार्गदर्शनामुळे जिंकल्या, असेही ते म्हणाले. माथूर हे राजकारणच नव्हे, तर समाजकारणातीलही ऑलराऊंडर आहेत. त्यांचा संघाचे प्रचारक ते सिक्कीमचे राज्यपाल हा प्रवास थक्क करणारा असल्याचे ते म्हणाले.
राजकारणातील आठवणींचे कथन
सत्काराला उत्तर देताना माथूर यांनी राजकारणातील विविध आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, राजकारणात कार्यकर्ते फार महत्त्वाचे असतात, मात्र त्यांना प्रोत्साहित करण्याची गरज असते. यावेळी सिक्कीमबाबत ते म्हणाले की, सिक्कीम राज्य हे चांगले असून, पर्यटकांनी भेट द्यायला हवी, त्यासाठी आपण खूप प्रयत्न करीत असून, ज्या ठिकाणी युद्धाच्या घटना घडल्या ती पर्यटनस्थळे करण्याचा आम्ही निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.