Join us

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधुंच्या युतीचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:02 IST

आगामी महापालिका निवडणुकीत हेच समीकरण राहिले तर महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेना आणि मनसेमध्ये युती होणार का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात असतानाच दोन्ही ठाकरे बंधूंनी बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ठाकरेंच्या संभाव्य युतीची चर्चा रंगली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत हेच समीकरण राहिले तर महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

येत्या १८ ऑगस्टला होणाऱ्या बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीसाठी ‘उत्कर्ष पॅनल’ जाहीर करण्यात आले असून, या पॅनलमध्ये उद्धवसेनेच्या नेतृत्वाखालील बेस्ट कामगार सेना आणि मनसे कर्मचारी सेना एकत्र लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या पॅनलच्या बॅनरवर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे छायाचित्र झळकत असून, त्यावर ‘ठाकरे ब्रँड’ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे निव्वळ बेस्ट निवडणुकीपुरती नव्हे, तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठीही नवा संकेत यातून दिला गेल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीला यश मिळाले, तर महापालिका किंवा आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही हेच समीकरण पुढे सरकण्याची शक्यता आहे.

उत्कर्ष पॅनलमुळे घडामोडींना वेगदि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत उद्धवसेना आणि मनसेने एकत्र येत उत्कर्ष पॅनल तयार केले आहे. या पॅनलचा बॅनरदेखील झळकल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 

टॅग्स :बेस्टमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाशिवसेना