कोरोनाचे ‘विघ्न’ दूर करणाऱ्यांसाठी सिध्दीविनायक धावला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 02:19 AM2020-04-16T02:19:34+5:302020-04-16T02:20:24+5:30

अन्नदानासह मास्कचे वाटप : रक्तदान मोहीम सुरू, व्हॅन रक्तदात्याच्या घरी येऊन घेणार रक्त

Siddhivinayak ran for Corona's 'obstacles'! | कोरोनाचे ‘विघ्न’ दूर करणाऱ्यांसाठी सिध्दीविनायक धावला!

कोरोनाचे ‘विघ्न’ दूर करणाऱ्यांसाठी सिध्दीविनायक धावला!

Next

मुंबई : प्रभादेवी येथील सिध्दीविनायक मंदिराकडून पोलीसांसह आपत्कालीन सेवा देत असलेल्या कामगारांना दररोज जेवण दिले जात असून, मंदिराने शिवभोजनासाठी तब्बल ५ कोटी रुपयांची मदत केली आहे. शिवाय रक्तदान मोहीम सुरू आहे.

राज्य सरकारला शिवभोजनासाठी ५ कोटी रुपये दिले आहेत. दररोज २ ते अडीच हजार जेवणाचे पॅकेट मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीसांना देत आहोत. जेवणाचे बाराशे पॅकेट रात्री आणि दिवसा असे पोलीसांना वितरित केले आहेत. मध्य मुंबईत असलेल्या पोलीस ठाण्यापर्यंत हे जेवण पोहचत आहे. मुंबई पोलिसांना २१ हजार मास्क दिले आहेत. शिवाय सॅनिटायझर्सच्या बाटल्याही पोलीसांना दिल्या आहेत. यातील बहुतांशी मदत ही मुंबईपुरती मर्यादित आहेत. तर शिवभोजनाला केलेली मदत ही राज्यासाठी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्यात यावेळी रक्त पुरवठा कमी पडू नये म्हणून रक्तदान शिबिर भरवित आहोत. सोसायट्या, मंडळे यांच्याद्वारे रक्तदान शिबिर भरवित रक्त कमी पडणार नाही; याची खबरदरी घेतली जात आहे, असे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले.

श्रीसिद्धीविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समिती यांच्याकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. ज्यांना रक्तदान करण्याची इच्छा आहे त्यांनी आपले नाव श्री सिद्धिविनायक गणपती मंदीरात दुरध्वनीद्वारे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत नोंदवावे. यासाठी ०२२-२४२२४४३८ आणि ०२२-२४२२३२०६ या क्रमांकावर संपर्क साधावा. रक्तदात्याच्या रहात्या घराच्या जवळ, थेट सोसायटीच्या आवारात श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाची रक्त संकलन व्हॅन पोहचेल. त्यामुळे रक्तदात्याना रहात्या ठिकाणी रक्तदान करता येईल.

Web Title: Siddhivinayak ran for Corona's 'obstacles'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.