Join us  

श्रावण सरी; रंगला ऊनं पावसाचा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 5:12 PM

बुधवारी रंगलेल्या ऊनं पावसाच्या खेळाने मुंबईकरांना श्रावण सरींची प्रचिती आली.

मुंबई : बुधवारी रंगलेल्या ऊनं पावसाच्या खेळाने मुंबईकरांना श्रावण सरींची प्रचिती आली. सकाळी, दुपारी आणि सुर्यास्तापर्यंत मुंबईकरांना सातत्याने ऊनं पावसाचे चित्र पाहण्यास मिळत होते. दुपारी २ ते ४ या काळात मात्र पाऊस ब-यापैकी विश्रांतीवर असतानाच दाटून आलेल्या ढगांनी पावसाची वर्दी दिली खरी; मात्र बरसात काही झालीच नाही.

मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत ८९ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली आहे. २८ जुलैपर्यंत मुंबईत १ हजार ८७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाची वार्षिक सरासरी २ हजार ६६८ मिलीमीटर आहे. तर टक्के वारी ७३.५५ आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराच्या आणि पश्चिम उपनगराच्या तुलनेत पूर्व उपनगरात कमी पाऊस पडत आहे. बुधवारी शहरात ८५.२, पूर्व उपनगरात १३.९८ आणि पश्चिम उपनगरात ३४.९२ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी पाऊस कोसळत असतानाच २ ठिकाणी घरांचा भाग पडला. ७ ठिकाणी झाडे कोसळली. १० ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. 

गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. ३० जुलै रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांचा कडकडाट होईल. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. 

टॅग्स :पाऊसमुंबईमुंबई मान्सून अपडेटमानसून स्पेशल