Nylon Manja: दोर पतंगाची कापायची की आयुष्याची? नायलॉन मांजा वापरल्यास थेट जेलची हवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:17 IST2025-12-19T13:15:28+5:302025-12-19T13:17:00+5:30
Nylon Manja Ban: पतंग उडवण्यासाठी नायलॉनचा मांजा वापरण्यात येत असल्यामुळे पशुपक्षी जखमी होण्याबरोबर त्यांचे प्राण जाण्याचाही मोठा धोका असतो.

Nylon Manja: दोर पतंगाची कापायची की आयुष्याची? नायलॉन मांजा वापरल्यास थेट जेलची हवा!
मुंबई : गेल्यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवसात नायलॉन मांजामुळे मुंबईत एका पोलिसासह तरुणाला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे येणाऱ्या मकर संक्रांतीला नायलॉनच्या मांजाचा वापर करू नका अन्यथा थेट गुन्हे दाखल होतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
मकर संक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणात पंतग उडवले जातात. मात्र, पतंग उडवण्यासाठी नायलॉनचा मांजा वापरण्यात येत असल्यामुळे पशुपक्षी जखमी होण्याबरोबर त्यांचे प्राण जाण्याचाही मोठा धोका असतो. याशिवाय इतरही अनेक समस्या निर्माण होतात. हे लक्षात घेत मुंबई पोलिसांकडून नायलॉनचा मांजा आणि काचेची कोटिंग असलेल्या मांजाची विक्री, साठा आणि वापर यावर या काळात बंदी घालण्यात येते. तसेच विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात येते.
पोलिसाने गमावला जीव
१२ डिसेंबर २०२४ रोजी पश्चिम द्रुतगती मार्गावर नायलॉन मांजामुळे समीर जाधव या पोलिस हवालदाराचा मृत्यू झाला. दिंडोशी पोलिस ठाण्यात ते कार्यरत होते. कर्तव्य उरकून घरी परतत असताना मांजामुळे त्यांना जीव गमवावा लागला होता.
एकाचा मृत्यू, तर एक जखमी...
१४ जानेवारी २०२३ रोजी मांजामुळे मोहम्मद शेख इजराईल फारुखी (२१) यांचा मृत्यू झाला. तर जालिंदर भगवान नेमाने (४१) हे गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी बोरिवली आणि विलेपार्ले पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली होती.
गेल्या वर्षी ९२ गुन्ह्यांची नोंद
गेल्यावर्षी २५ डिसेंबरपासून नायलॉन मांजाच्या वापराविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती.
या मोहिमेत १४ जानेवारीपर्यंत मुंबईतील २ विविध पोलिस ठाण्यांमध्ये २२ गुन्हे दाखल करत ५७ जणांना बेड्या ठोकल्या. या कारवाईत एक लाख ४३ हजार २४० किमतीचा नायलॉन मांजाही हस्तगत केला होता.