पुणे - तुम्हाला निवडणूक लढवायची आहे ना? मग तुमच्या मतदारसंघाच्या मतदारयाद्या तपासायला घ्या, मतदार नोंदणीवरही लक्ष ठेवा, असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला. आयोगाच्या यंत्रणेप्रमाणेच तुमचे दोनजण तुमच्या प्रभागासाठी नियुक्त करा व त्यांची नावे मला द्या, असेही त्यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या शहर पदाधिकारी तसेच शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष यांची बैठक झाली. अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे तसेच संपर्क नेते बाबू वागसकर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
हा मुद्दा मी आधीच मांडला राज ठाकरे म्हणाले, मतचोरीचा मुद्दा मी २०१७ च्या निवडणुकीत उपस्थित केला होता. आज त्यातील खरेपणा सर्वांना दिसतो. त्यामुळेच तुम्हाला निवडणूक लढवायची तर काळजीपूर्वक लढवावी लागेल.त्यासाठी तुमच्या प्रभागातील मतदारयाद्यांची तपासणी करायला सुरुवात करा. आयोगाच्या यंत्रणेत असतात तसे तुमच्या मतदारयादीत नाव असलेले दोन सहकारी नियुक्त करा. त्यांची नावे मला पाठवा. हे कराल तरच निवडणूक लढवा.