Join us
Daily Top 2Weekly Top 5

धारावीतील रहिवाशांना दुसरीकडे पाठवायचे का? उद्धवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 09:23 IST

मुंबई मराठी पत्रकार संघात मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे उद्धवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या वार्तालापाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘बीकेसी’ला लागून असलेल्या धारावीच्या जमिनीला मोठी किंमत आली आहे. त्यामुळे या लोकांना दुसरीकडे पाठवायचे आहे  का, अशी घणाघाती टीका महाविकास आघाडी आणि उद्धवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांनी केली. 

मुंबई मराठी पत्रकार संघात मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे उद्धवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या वार्तालापाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. यावेळी देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधत केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, कार्यवाह संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर उपस्थित होते. धारावीचा विकास प्रत्येकाला हवा आहे. मात्र, इथे पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या लोकांना आणि मेहनतीने उद्योग-व्यवसाय उभारलेल्यांना याच ठिकाणी घर आणि व्यवसायासाठी जागा द्यावी लागेल. आमचा धारावीच्या लोकांना मिठागरांच्या जमिनीवर पाठविण्याला विरोध आहे, असेही देसाई यांनी नमूद केले. 

माहुल भागात प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. या भागातील स्थिती गॅस चेंबरपेक्षा भीषण आहे.  रिफायनरी, आरसीएफ यांचा परिसर आणि प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेल्या घरांच्या ठिकाणी लोकांना श्वास घ्यायलाही त्रास होतो. त्यातून अस्थमाच्या आजाराची समस्या वाढली असल्याचे देसाई म्हणाले.

शिवाजी पार्कवरील १७ मे रोजीच्या सभेसाठी आम्ही फार आधी अर्ज केला होता. मात्र या मैदानासाठी केलेल्या अर्जांचे इनवर्ड आता दाखविले जात नाही. आता आधी त्यांचा अर्ज आला असे सांगून मैदान त्यांना दिले आहे. या प्रकारचा व्यवहार उच्च न्यायालयाने गेल्यावेळी समोर आणला होता. त्यामुळे त्यांना आळा बसेल ही अपेक्षा होती. मात्र आता पुन्हा खोडी केल्या आहेत. या वृत्ती थांबल्या पाहिजेत. मुंबईतील मतदार सुज्ञ आहेत. 

टॅग्स :अनिल देसाईशिवसेनाउद्धव ठाकरेमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४