Join us  

'अशी वेळ कुणावरही येऊ नये', तावडेंचा 'तो' टोमणा स्वत:वरच उलटला 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 6:02 PM

विद्यार्थीदशेपासून तावडेंनी भाजप आणि अभाविपचं काम केलं. या क्षणाला त्यांच्या परिवाराची काय भावना असेल हे मी समजू शकतो.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे महाआघआडीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी विनोद तावडेंना भाजपाने उमेदवारी न दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच, अशी वेळ कुणावरही येऊ नये. आज मी त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना काय झाल्या असतील, हे समजू शकतो, असेही आव्हाड यांनी म्हटले आहेय  

विद्यार्थीदशेपासून तावडेंनी भाजप आणि अभाविपचं काम केलं. या क्षणाला त्यांच्या परिवाराची काय भावना असेल हे मी समजू शकतो. अशी वेळ कुणावरही येऊ नये. विनोद तावडेंनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना विधानसभा निवडणूक न लढण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तावडेंचंच तिकीट कापल्यानंतर त्यांची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली असून तावडेंची खिल्लीही उडविण्यात येत आहे. 

विधानसभेतील कामकाजावेळी विनोद तावडेंनी जितेंद्र आव्हाडांना उपरोधात्मक टोला लगावला होता. अध्यक्ष महोदय, त्यांना बोलू द्या.. पुढच्या वेळेस ते विधानसभेत येतील की नाही याची काही खात्री नाही, असा टोमणा मंत्री तावडे यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विधानसभेत लगावला होता. आज भाजपने तावडेंचं तिकीट कापलं आहे. त्यावर, जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं. आव्हाड यांना विधानसभेतील तो किस्सा आठवला. तर, विनोद तावडेंना तिकीट नाकारल्यामुळे आता तावडेच विधानसभेत दिसणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.  

टॅग्स :विनोद तावडेराष्ट्रवादी काँग्रेसजितेंद्रविधानसभा निवडणूक 2019राजकारण