मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर गोल्फ कोर्स की रुग्णालय उभारायचे? पर्यावरणीय अहवालानंतर महानगरपालिका घेणार अंतिम निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 10:05 IST2025-09-28T10:05:00+5:302025-09-28T10:05:38+5:30
मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकणे पूर्णपणे बंद झाले असून, तेथील मोकळ्या जागेचे नेमके काय करायचे, याबाबत निर्णय घेण्यापूर्वी मुंबई महापालिका या जागेचे सखोल पर्यावरणीय विश्लेषण करणार आहे.

मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर गोल्फ कोर्स की रुग्णालय उभारायचे? पर्यावरणीय अहवालानंतर महानगरपालिका घेणार अंतिम निर्णय
मुंबई : मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकणे पूर्णपणे बंद झाले असून, तेथील मोकळ्या जागेचे नेमके काय करायचे, याबाबत निर्णय घेण्यापूर्वी मुंबई महापालिका या जागेचे सखोल पर्यावरणीय विश्लेषण करणार आहे. या विश्लेषणातून जागेची माती, भूजल, हवा आणि गॅस उत्सर्जन किती दूषित आहे, याची तपासणी केली जाईल. हा अहवाल आल्यानंतरच या २४ हेक्टर जागेच्या विकासाची अंतिम योजना ठरवली जाईल. त्यानंतरच या जागेवर गोल्फ कोर्स उभारायचे की रुग्णालय याबाबत निर्णय होणार आहे.
जागेच्या तपासणीसाठी पालिका एका खासगी एजन्सीची मदत घेणार आहे. एजन्सी मातीची तपासणी करील. त्यात मातीतील ओलावा, सेंद्रिय घटक आणि कॅल्शिअम, निकेलसारखे एकूण ३९ घटक तपासले जातील. जमिनीखालील पाण्याची गुणवत्ता तपासली जाईल. यासाठी गढूळपणा, रंग, वास, पीएच पातळी तसेच शिसे, जस्त आणि ॲल्युमिनिअमचे प्रमाण तपासले जाईल. यासाठी ४८ घटक तपासले जातील.
भविष्यातील योजना काय आहेत?
या जागेवर विकास करण्याच्या अनेक कल्पना आहेत. स्थानिक भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी या जागेवर गोल्फ कोर्स बनवण्याचा प्रस्ताव दिला होता; तर, खासदार संजय पाटील यांनी रुग्णालय किंवा महाविद्यालय उभारण्याची सूचना केली आहे. पर्यावरण विश्लेषणाचा अहवाल आल्यानंतर, या जागेवर आरोग्य सुविधा द्यायची की मनोरंजनाचे ठिकाण बनवायचे, याबद्दल पालिका अंतिम निर्णय घेईल.
१५ घटकांच्या आधारे करणार हवेचे निरीक्षण
हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण एकूण १५ घटकांवर केले जाईल. जागेतून बाहेर पडणाऱ्या गॅसमध्ये मिथेन, बेंझीन आणि इतर विषारी वायू किती प्रमाणात आहेत, हे तपासले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे तीन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. एका आठवड्यात कामाचे अंतिम आदेश दिले जातील.
डम्पिंगची सध्याची स्थिती
डम्पिंग ग्राउंड डिसेंबर २०१८ मध्ये बंद करण्यात आले. पालिकेने बायो-मायनिंग म्हणजेच कचऱ्यापासून माती वेगळी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत ७० लाख मेट्रिक टन कचरा साफ करण्यात आला आहे. पुढील एका वर्षात उर्वरित २१ लाख टन कचरा पूर्णपणे साफ करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे.