मुंबई : सांडपाणी वाहून नेणा-या गटारांमध्ये नागरिक कचरा टाकत असल्याने मुंबईचा समुद्रकिनारा प्रदूषित झाला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली.मुंबईत सांडपाणी वाहून नेणारी १०७ गटारे आहेत. ही गटारे थेट अरबी समुद्रात सोडण्यात आली आहेत. उपनगरात अशी गटारे रस्त्याच्या दोन्ही बाजूला बांधण्यात आली आहेत. या खुल्या गटारांतील सांडपाणी नाल्यात, खाडीत किंवा समुद्रात सोडण्यात येते, अशी माहिती मुंबई महापालिकेने प्रतिज्ञापत्राद्वारे न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाला दिली.आजूबाजूचे रहिवासी अशा गटारांमध्ये घनकचरा व कचरा टाकतात. त्याशिवाय मैलाही या गटारांमध्ये टाकण्यात येतो. या गटारांचे पाणी थेट समुद्रात जात असल्याने मुंबईचा समुद्रकिनारा दूषित झाला आहे. शिवाय मुंबईतील झोपडपट्ट्यांतील गटारांतूनही प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट समुद्रात जाते, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.डेब्रिज व कचºयाची विल्हेवाट लावण्यासंबंधी व ते समुद्रात सोडण्यासंबंधी मागदर्शक तत्त्वे आखण्याचे निर्देश राज्य सरकार व महापालिकेला द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका ‘सिटीझन सर्कल फॉर सोशल वेल्फेअर अॅण्ड एज्युकेशन’ या एनजीओने उच्च न्यायालयात दाखल केली आहे.गेल्याच महिन्यात समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीमुळे मरिन ड्राइव्हवर ९,००० टन कचरा जमा झाला. मुंबईकरांनी समुद्रात टाकलेला कचरा समुद्राकडून परत मुंबईकरांनाच भेट देण्यात आला होता. याचिकाकर्त्यांनी या घटनेकडे उच्च न्यायालयाचे लक्ष वेधले. सर्व नद्या, नाले आणि रस्त्यालगतच्या गटारांमधील गाळ काढण्याचे काम महापालिका करणार आहे. त्यामुळे समुद्राचे प्रदूषण कमी होईल.>सुनावणी २७ आॅगस्टलागटारांमधून समुद्रात मोठ्या प्रमाणावर कचरा जात आहे. यावर उपाय म्हणून गाळ काढण्याचे काम करण्यात येईल, असे पालिकेने सांगितले. त्यांनरत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी २७ आॅगस्टला ठेवली.
खुल्या गटारांतून येणाऱ्या कच-यामुळे मुंबईचा समुद्रकिनारा दूषित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 04:53 IST