दिवाळीत खरेदीचा ‘फुलोरा’; शहरातील बाजारपेठांमध्ये शेवंतीचा धमाका, किलोचा भाव ४०० पार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 13:04 IST2025-10-19T13:03:47+5:302025-10-19T13:04:25+5:30
झेंडूची मिजास दोनशेवरच

दिवाळीत खरेदीचा ‘फुलोरा’; शहरातील बाजारपेठांमध्ये शेवंतीचा धमाका, किलोचा भाव ४०० पार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दसऱ्यानंतर आता पुन्हा एकदा दिवाळीला दादरचे फुलमार्केट बहरले आहे. पुढील सात ते आठ दिवस फुल मार्केट ओव्हर फ्लो असणार असून, लक्ष्मीपूजनासोबतच पाडव्यासह नरक चतुर्दशीला शेवंती आणि झेंडूची फुले अधिकने विकली जाणार आहे.
विशेष म्हणजे, फुलांचा भाव जास्तीचा असूनही दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा... असे म्हणत मुंबईकर ग्राहकांनी सजावटीच्या फुलांसोबत हिरव्यागार पानांनाही पसंती दिली आहे. शनिवारी तर दादर आणि लगतच्या परिसरात झालेल्या गर्दीमुळे येथे पाय ठेवायला जाग नव्हती आणि आता रविवारसोबतच पुढील आठवडा गर्दीचा असणार असून, खरेदी विक्रीचे विक्रम होतील, असा विश्वास विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.
गणेशोत्सवात जास्वंदी, दुर्वा आणि शेवंतीला अधिक मागणी होती. अबोली व मोगराही खरेदी केला जात होता. आता झेंडू आणि शेवंतीला अधिक मागणी आहे. दादरच्या फुलमार्केटमध्ये उत्सवांच्या सिझनमध्ये दररोज सुमारे ३० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. अबोली आणि मोगरा विमानाने दाखल होतो, याशिवाय वसई-विरार, पालघरमधूनही अबोली, मोगरा बाजारात दाखल होतो.
दसऱ्यानंतर विक्रेत्यांना काही काळापुरता आराम मिळाला होता. मात्र, आठवड्याभरापासून बाजारपेठा पुन्हा सजल्या असून, फुलमार्केट गर्दीने ओव्हरफ्लो झाले आहे. पहाटे ४ वाजल्यापासून सकाळी ११ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ४ पासून रात्री १० वाजेपर्यंत असणारी गर्दी दिवाळीच्या सिझनला दिवसभर नोंदविली जात आहे.
कर्जतहून येतात व्यावसायिक
माँसाहेब मीनाताई ठाकरे मंडईत ६०० छोटी-मोठी दुकाने. मंडईच्या आसपास फुले विकण्यासाठी टोपली घेऊन बसणारे सुमारे ३०० व्यावसायिक. फ्लायओव्हरलगत ३० दुकाने, याव्यतिरिक्त फुलांची टोपली घेऊन बसणारे ४०० जण कर्जत, कसाऱ्याहून पाने विक्रीसाठी येतात.
सर्वसाधारण गुलाबाच्या गुच्छाचे भाव १५० ते २०० रुपयांच्या घरात नोंदविले जात आहेत. दादर मार्केटमधील फुले पुणे ग्रामीण भागातील मावळ, तळेगाव, तासगावमधून येतात. गुलाब जास्त करून तासगावावरून येतात.
सजावट : शेवंतीचा वापर हार, वेणी आणि गुच्छ बनवण्यासाठी केला जातो. दसरा आणि दिवाळीसारख्या सणांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.
धार्मिक महत्त्व : शेवंतीला पवित्र मानले जात असून, पूजेसाठी याचा वापर होतो. फुलदाणीत ठेवण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर हाेतो. दसरा, दिवाळी, नाताळ, लग्नसराईमध्ये या फुलांना मुंबई, पुणे शहरांतून प्रचंड प्रमाणावर मागणी असते.