खरेदीचा उत्साह, बाजारात चैतन्य; व्यापारी वर्ग खूश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:07 IST2025-10-20T12:07:00+5:302025-10-20T12:07:20+5:30
लक्ष्मीपूजनासाठी झाडू, लाह्या-बत्ताशा, मिठाई, चोपडी घेण्यासाठी लगबग

खरेदीचा उत्साह, बाजारात चैतन्य; व्यापारी वर्ग खूश
महेश कोले, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि समृद्धीचा सण. लक्ष्मीपूजन व भाऊबीजनिमित्त रविवारी नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केल्याने उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मंगळवार, २१ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन असल्याने महिलांची पूजनासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी सुरू होती. दादर, लालबाग, क्रॉफर्ड मार्केट तसेच उपनगरांमधील स्थानिक मार्केटमध्ये रविवारी सकाळपासूनच नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडल्याचे पाहायला मिळाले.
गृहिणींच्या एका हातात झाडू, लक्ष्मीचे फोटो-मूर्ती, तर दुसऱ्या हातात प्रसादासाठी लाह्या-बत्ताशा, मिठाईच्या पिशव्या दिसत होत्या. त्याचबरोबर पूजेसाठी दादरच्या फूल मार्केटमध्ये लाल, पिवळा झेंडू, शेवंती, गुलाब, अस्तर, जाई-जुई, सोनचाफा, मोगरा आदी फुले तसेच गजरा यांच्या खरेदीची लगबग पाहायला मिळाली. प्रसादासाठी विविध प्रकारची मिठाई, सुकामेवा याला मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
स्टेशनरीच्या दुकानांमध्ये सकाळपासूनच रांगा
चोपडापूजनासाठी व्यापाऱ्यांनी नवीन डायऱ्या, खातेवही, सोनेरी पेन आणि नाणी घेतली. स्टेशनरी दुकानांमध्ये तर सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. मिठाई व फराळ वस्तूंच्या विक्रीतही भरघोस वाढ झाली. व्यापाऱ्यांच्या मते, ‘यावर्षी मागील वर्षांच्या तुलनेत ग्राहकांची गर्दी जास्त असून, विक्री समाधानकारक आहे.
भाऊबीजेसाठी कपडे, सजावटीची ताटे, शुभवस्तू
भाऊबीजेनिमित्त खरेदी जोमात सुरू होती. बहिणींकरिता भेटवस्तू, कपडे, मिठाई, सजावटीची ताटे आणि शुभवस्तू अनेकांनी खरेदी केल्या. काहींनी गिफ्ट हॅम्पर आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची निवड केली. दुसरीकडे भावांना रिर्टन गिफ्ट घेण्याकडे अनेक महिलांचा कल दिसून आला. ‘भावाला काहीतरी खास द्यायचं,’ या भावनेने प्रत्येक बहीण उत्साही दिसत होती.
लक्ष्मीपूजन म्हणजे घरात शुभत्वाचं प्रतीक. म्हणून प्रत्येक वर्षी नवीन झाडू, मूर्ती आणि चोपडी घेतो. या वस्तू घेतल्यावरच दिवाळीचा आनंद खरा वाटतो. - लीला गुडुळकर, गृहिणी.