मुंबईच्यागोरेगावमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने रिक्षावाल्याला थांबवून, पैसे आणून देतो असं म्हणून इमारतीत जाऊन उडी मारून स्वतःला संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबईच्यागोरेगावमधील आरे भागात ही घटना घडली आहे. आपल्याकडे सुटे पैसे नसल्याचे म्हणत तरुण रिक्षातून उतरला, आणि रिक्षावाल्याला तिथेच थांबवून तो इमारतीच्या आतमध्ये गेला. मात्र, पैसे घेऊन येण्याऐवजी त्याने याच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.
या तरुणाची अद्याप ओळख पटली नसून, आरे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१ जुलै) सकाळी २० ते २५ वयोगटातील एक अनोळखी तरुण गोरेगाव पूर्वेकडील एका गृहनिर्माण संकुलात रिक्षाने आला. त्याने सुरक्षा रक्षकाला सांगितले की, तो एका फ्लॅटमध्ये कुणालातरी भेटायला आला आहे आणि तिकडे जाऊन तो रिक्षाचे भाडे घेऊन लगेच परत येईल.
आत्महत्येपूर्वीही दिसलेला परिसरात फिरताना
मात्र, काही वेळातच त्याने गृहनिर्माण संकुलात आत्महत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळावरून तरुणाचा एक गुगल पिक्सेल स्मार्टफोन जप्त केला आहे, जो बंद अवस्थेत होता. पोलिसांनी असेही सांगितले की, या तरुणाला यापूर्वी दोन-तीन वेळा या परिसरात पाहिले गेले होते.
आरे पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून, त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ट्रॉमा केअर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, अशी माहिती 'टाइम्स नाऊ'च्या वृत्तात देण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.