Join us
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक... रुग्णालयात ईसीजी काढताना महिला रुग्णाचे दागिने लंपास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 17:23 IST

अंधेरीच्या बीएसईएस रुग्णालयातील प्रकार

मुंबई : आईला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्याने, तिला अंधेरीच्या बीएसईएस रुग्णालयात आणले. मात्र, उपचारादरम्यान तिच्या अंगावरचे दागिने रुग्णालयातच चोरी झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला. या प्रकरणी डी.एन. नगर पोलिस तपास करीत आहेत.

तक्रारदार संतोषकुमार यादव (३६) हे मेट्रो रेल्वेमध्ये सिव्हिल इंजिनीअर आहेत. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची आई कलावती (वय ६०) यांना ११ जुलैला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना अत्यवस्थ वाटू लागले. संतोषकुमार यांनी त्यांना बीएसईएस रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात गेले. डॉक्टरने त्यांना तपासून त्यांना कॅज्युॲलटीच्या आत नेले आणि यादव हे पेपर बनविण्यासाठी मुख्य द्वाराजवळ असलेल्या काउंटरवर गेले. इसीजी आल्यावर कलावती यांना पुढील औषधोपचारासाठी ऑक्सिजन मास्क लावून सातव्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात दाखल करून घेण्यात आले. दरम्यान, कलावती यांच्या अंगावरील सोन्याची अंगठी, कानातील रिंग, नथनी, चांदीचे पैंजण आणि जोडवे, कपडे आणून नर्सने त्यांच्या वडिलांच्या हातात दिले. मात्र, आईच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र आणि डाव्या हातातील सोन्याची अंगठी त्यात नव्हती. त्यावरून यादव यांनी नर्सला याबाबत विचारणा केली असता, या व्यतिरिक्त अजून काहीही आमच्याकडे नव्हते, असे उत्तर नर्सने दिले. त्यानंतर, अतिदक्षता विभागातील नर्सकडे यादव यांनी चौकशी केली असता, कलावती यांना अतिदक्षता विभागात आणले, तेव्हा त्यांच्या अंगावर दागिने होते, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, यादव यांनी पुन्हा सर्व कपडे तपासले, दवाखान्यात आणि घरी जाऊनही दागिन्यांचा शोध घेतला. मात्र, ते कुठेच सापडले नाहीत.

ईसीजी करताना दागिने काढले?रुग्णालय प्रशासन अधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितल्यावर, त्यांनी सीसीटीव्ही यादव यांना दाखविले. ज्यात यादव यांच्या आईला कॅज्युॲलटीमध्ये नेताना, तसेच त्यापूर्वीही दागिने स्पष्ट दिसत होते. ईसीजी करताना एक नर्स काही वेळासाठी कलावती यांच्यासोबत एकटीच होती, तिच्यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णालय प्रशासनाने दोन दिवसांचा वेळ यादव यांच्याकडे मागितला होता. मात्र, त्यानंतरही त्यांनी कोणताच प्रतिसाद न दिल्याने, यादव यांनी डी.एन. नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

तक्रार अर्ज मिळाल्यानंतर, आम्ही रुग्णालय प्रशासनातील १५ ते २० जणांकडे याबाबत चौकशी केली. या प्रकरणी आम्ही अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक केली नाही. अधिक तपास सुरू आहे.- वरिष्ठ तपास अधिकारी, डी.एन. नगर पोलिस ठाणे.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबईहॉस्पिटल