मुंबईत धक्कादायक घटना: सर्जन उपलब्ध नसल्याने रुग्णाचा मृत्यू; स्ट्रेचरही मिळाली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 06:03 IST2025-04-10T06:02:38+5:302025-04-10T06:03:02+5:30

संबंधित विभागात गेल्यावर डॉक्टरच उपस्थित नसल्याने थोडा वेळ थांबावे लागेल, असे अविनाश यांना सांगण्यात आले. तिथेही बराच वेळ गेला. अखेरीस अविनाश यांनी रुग्णालयातच प्राण सोडले.

Shocking incident in Mumbai Patient dies due to unavailability of surgeon | मुंबईत धक्कादायक घटना: सर्जन उपलब्ध नसल्याने रुग्णाचा मृत्यू; स्ट्रेचरही मिळाली नाही

मुंबईत धक्कादायक घटना: सर्जन उपलब्ध नसल्याने रुग्णाचा मृत्यू; स्ट्रेचरही मिळाली नाही

मुंबई : अनामत रक्कम भरण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने वेळीच उपचार न झाल्याने पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, करदात्यांच्या पैशावर चालणाऱ्या शताब्दी या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील गैरसोयींमुळे एका रुग्णाला प्राण गमवावा लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अविनाश शिरगावकर (४५) असे मृत रुग्णाचे नाव आहे.

चेंबूर-घाटला येथे राहणाऱ्या अविनाश शिरगावकर यांना सोमवारी सायंकाळी मूत्र विसर्जनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे भाऊ अरुण यांनी अविनाश यांना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र, सर्जन उपस्थित नसल्याने रुग्णालय प्रशासनाने अविनाश आणि अरुण यांना सायन रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. दोन तास रखडल्यानंतर अविनाश यांना हा सल्ला देण्यात आला. त्यामुळे त्यांची तब्येत आणखीनच बिघडली.

लघवी होत नसल्याने त्यांचे पोट गच्च भरले होते. त्याच अवस्थेत अविनाश यांना सायन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथेही स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने त्यांना काही मजले पायी चढावे लागले. संबंधित विभागात गेल्यावर डॉक्टरच उपस्थित नसल्याने थोडा वेळ थांबावे लागेल, असे अविनाश यांना सांगण्यात आले. तिथेही बराच वेळ गेला. अखेरीस अविनाश यांनी रुग्णालयातच प्राण सोडले.

... तर जीव वाचला असता!
गोवंडी शताब्दी रुग्णालयात गेले अनेक महिन्यांपासून गैरसोय होत आहे. शताब्दी रुग्णालय सुसज्ज असते, तज्ज्ञ डॉक्टर तिथे वेळीच उपलब्ध असते, तर आम्हाला गोवंडी-सायन असे खेटे घालावे लागले नसते. या सगळ्या प्रक्रियेत वेळ गेला आणि भावाच्या जीवावर बेतले, अशी खंत अरुण शिरगावकर यांनी व्यक्त केली.

कारभार सुधारला नाही...
पुरेसे डॉक्टर आणि अन्य कर्मचारी नाहीत. याच रुग्णालयाची नवी सुपर स्पेशालिटी इमारत उभी आहे, पण ती सुरू नाही. आम्ही अनेकदा आंदोलने केली, रुग्णालय प्रशासनाकडे कैफियत मांडली, उपोषणे केली, पण रुग्णालयाचा कारभार काही सुधारला नाही. याच गैरसोयींमुळे शिरगावकर यांचा मृत्यू झाला, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नागराळे यांनी केला.

Web Title: Shocking incident in Mumbai Patient dies due to unavailability of surgeon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.