धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 05:22 IST2025-12-13T05:22:18+5:302025-12-13T05:22:42+5:30
दहा महिन्यांत गुन्ह्यांचा आकडा १,१८७ वर : ३० दिवसांत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे १३६ गुन्हे

धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
मुंबई : सतत धावणाऱ्या मायनगरी मुंबईत मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याचे पाेलिस दप्तरी दाखल गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. गेल्या दहा महिन्यांत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे ११८७ गुन्हे मुंबई पोलिसांच्या दप्तरी नोंद झाले आहेत. यापैकी १११८ गुन्ह्यांची उकल झाली असून, इतर प्रकरणांचा तपास सुरू आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात या घटनांमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यात मुलींच्या अपहरणाचे १३६ गुन्हे नोंद झाले असून, त्यापैकी १०२ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. आकडेवारीनुसार दिवसाला चार ते पाच जणी बेपत्ता होत आहेत.
मुंबई पोलिसांच्या जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, मुंबईत महिलांसंबंधित ५८८६ गुन्हे नोंद झाले आहेत. त्यापैकी ५५६१ गुन्ह्यांचा उलगडा झाला. यामध्ये १०२५ बलात्काराच्या गुन्ह्यांत अल्पवयीन मुली संबंधित ५२६ गुन्ह्यांचा समावेश आहे. दुसरीकडे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे ११८७ गुन्हे दाखल असून, तपास सुरू आहे. यात जानेवारी महिन्यात १२६ गुन्हे नोंद झाले होते. त्यानंतर मार्च, ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये हा आकडा १३६च्या वर गेला आहे. तर नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंतही गुन्ह्याने शंभरी पार केली.
रायगड अनाथाश्रम लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीचा १४ वर्षांचा कारावास कायम
मुंबई : रायगड जिल्ह्यातील एका अनाथाश्रमात अनाथ मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली एका व्यक्तीला कनिष्ठ न्यायालयाने दिलेली १४ वर्षांची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. प्रकरण खालापूरमधील एका अनाथाश्रमाशी संबंधित आहे.
पीडित मुलींपैकी एकीने शिक्षिकेला सांगितले. तेव्हा हे लैंगिक अत्याचार उघडकीस आले. त्यांनी बाल कल्याण समितीला माहिती दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मुलींची सुटका केली आणि रसायनी पोलिसांकडे तक्रार केली. अनाथाश्रमाच्या व्यवस्थापकाची मुले ख्रिश्चन आणि जॉय राजेंद्रन यांना २०१५मध्ये आठ अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी पनवेल सत्र न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावली होती. ख्रिश्चन याला १४ वर्षांची आणि जॉयला १० वर्षांची कारावासाची शिक्षा झाली होती.
काय म्हणाले न्यायालय?
मुली आश्रमात आनंदी होत्या. त्यांनी निबंधामध्ये आश्रमाचे कौतुक केले होते, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. मात्र, न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद फेटाळला. मुलींना मोकळ्या वातावरणात हलवल्यानंतर त्या मोकळेपणाने बोलू शकतात, असे न्या. आर. एम. जोशी यांच्या एकलपीठाने म्हटले. तर अनेक पीडितांनी साक्ष दिली की, ख्रिश्चनने त्यांना अश्लील व्हिडीओ दाखवत वारंवार लैंगिक शोषण केले, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.
१,२२६ अपहरणाचे गुन्हे
घडले २०२४ मध्ये
१,१४२ गुन्ह्यांची उकल करण्यात आली
पोलिसांकडून अल्पवयीन मुलांसबंधितच्या गुन्ह्यात तत्काळ दखल घेत गुन्हे नोंदवत कारवाई करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.