Mumbai Dream Mall: मुंबईतील भांडुप परिसरात असणाऱ्या ड्रीम मॉलमध्ये एका ३० ते ३५ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. सकाळी १० वाजताच्या सुमारास काही लोकांना मॉलच्या बेसमेंटमधील पाण्यावर एक मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. याबाबतची माहिती तातडीने पोलिसांना कळवण्यात आली. त्यानंतर सदर तरुणीला मुलुंडमधील जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
भांडुपमधील ड्रीम मॉल मागील अनेक वर्षांपासून बंद आहे. आगीच्या घटनेत जळून खाक झाल्यापासून हा मॉल बंद अवस्थेत आहे. त्यामुळे सदर मॉलमध्ये यापूर्वीही अनेकदा अनुचित घटना घडल्या आहेत. अशातच आता पुन्हा एकदा एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आल्याने ड्रीम मॉलमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवावी, अशी मागणी समोर येऊ लागली आहे.
दरम्यान, मृतावस्थेत आढळलेल्या तरुणीची ओळख अद्याप पटू शकली नसून पोलिसांकडून सदर तरुणीच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे. तसंच या तरुणीची हत्या करण्यात आली की तिने आत्महत्या केली, याबाबतही अधिक तपास भांडुप पोलीस करत आहेत.