धक्कादायक! लिफ्टमध्ये अडकून ५ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 23:37 IST2020-11-28T23:32:39+5:302020-11-28T23:37:59+5:30
Mumbai : धारावी येथील क्रॉसरोड परिसरात असलेल्या कोझी शेल्टर या सात मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या ५ वर्षीय मोहम्मद हुजेईफा सर्फराज शेख या मुलाचा मृत्यू झाला.

धक्कादायक! लिफ्टमध्ये अडकून ५ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
मुंबई : तुमचाही चिमुकला लिफ्टने एकटा ये जा करतोय का?, असेल तर वेळीच सावध होण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. धारावीत लिफ्टमध्ये अड़कून ५ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची काळाजाचा ठोका चुकवणारी घटना शुक्रवारी धारावीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धारावी येथील क्रॉसरोड परिसरात असलेल्या कोझी शेल्टर या सात मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या ५ वर्षीय मोहम्मद हुजेईफा सर्फराज शेख या मुलाचा मृत्यू झाला आहे. शाहू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विलास गंगावणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी पावणे एकच्या सुमारास शेख हा त्याची ७ वर्षाची मोठी बहीण व ३ वर्षाची लहान बहीण यांच्यासोबत सदर बिल्डिंगच्या लिफ्ट मधून तळ मजल्यावरून चौथ्या मजल्यावर येत असताना हा अपघात घडला आहे.
लिफ्ट चौथ्या माळ्यावर पोहचल्यानंतर त्याच्या दोन्ही बहिणी बाहेर गेल्या. त्यानंतर शेखने बाहेर जाताना तो लिफ्ट चे लोखंडी ग्रील बंद करत असताना त्याला बाहेर जाता आले नाही. अशातच लाकडी सेफ्टी दरवाजा बंद झाला. आणि लिफ्ट सुरु होऊन शेख लिफ्टच्या लोखंडी ग्रील व लाकडी दरवाज्यामध्ये अडकून, लिफ्टवर गेल्यानंतर लिफ्टच्या खालील मोकळ्या जागेत पडून गंभीर जखमी झाला. डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत समजताच शेख कुटुंबियासह सर्वानाच धक्का बसला आहे.
हा घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. घटनेची वर्दी लागताच धारावी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरु केला आहे.
पालकांनो सावध व्हा...
आपला पाल्य क़ाय करतो याकडे पालकांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांच्या थोडेसे दुर्लक्ष महागात पडू शकते. रहिवाशी, पालक तसेच हद्दीमधील लिफ्ट असलेल्या इतर रहिवाशांनी आपल्या मुलांना लिफ्ट मधून एकटे न सोडण्याबाबत आणि लिफ्टमन शिवाय लिफ्ट मध्ये प्रवेश देवू नका असे आवाहन केले आहे.