Join us

Narayan Rane: राणेंनी दर्शन घेतल्यानंतर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून केलं स्मृती स्थळाचं शुद्धीकरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 19:19 IST

Narayan Rane: शिवसैनिकांनी राणेंच्या भेटीनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं आहे. 

Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईत जनआशीर्वाद यात्रा केली. यात राणेंनी दादर येथील शिवाजी पार्कमध्ये दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट दिली आणि ते नतमस्तक झाले. त्यानंतर राणेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळासाहेब आज असते तर त्यांनी मला नक्कीच आशीर्वाद दिले असते, असं वक्तव्य केलं. दुसरीकडे शिवसैनिकांनी राणेंच्या भेटीनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं आहे. 

'साहेब आज हवे होते..त्यांनी नक्कीच आशीर्वाद दिला असता', नारायण राणे बाळासाहेबांच्या स्मृती स्थळासमोर नतमस्तक

बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे केअर टेकर आप्पा पाटील यांनी स्मृतीस्थळावर आधी दुग्धाभिषेक आणि त्यानंतर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं आहे. आज सकाळी नारायण राणे यांनी स्मृती स्थळाचं दर्शन घेतल्यामुळे हे शुद्धीकरण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी शिवसेनेचे इतर कार्यकर्ते देखील उपस्थित होते. 

केंद्रीय मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर नारायण राणे यांनी आज मुंबईत जनआशीर्वाद यात्रा केली. मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर राणेंचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर परिसरात राणे दाखल झाले आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं. शिवसैनिकांनी राणेंना स्मृतीस्थळावर येऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी शिवाजी पार्क परिसरात ठेवण्यात आला होता. 

टॅग्स :नारायण राणे शिवसेनाबाळासाहेब ठाकरे