Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shivsena: "एका राऊतांनी अर्धी शिवसेना संपवली, उरलेली संपवायला आता विनायक राऊत पुरेसे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 17:58 IST

Shivsena: आदित्य ठाकरे यांनी सोमवारी कोकणात झालेल्या निष्ठा यात्रेत कुडाळमध्ये बंडखोर आमदारावर जोरदार टीका केली

मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नाट्य रंगलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केलं. त्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अद्यापही सुरू आहेत. यातच शिवसैनिकांना बळ देण्यासाठी अन् पक्षाला उभारी देण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा सुरु केली आहे. ते बंडखोर आमदारांचा गद्दारच असे म्हणत उल्लेख करतात. विशेष म्हणजे यावेळी खासदार विनायक राऊत यांनीही शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांच्यावर टिका केली. त्याला, आता केसरकरांनी उत्तर दिले आहे.

आदित्य ठाकरे यांनी सोमवारी कोकणात झालेल्या निष्ठा यात्रेत कुडाळमध्ये बंडखोर आमदारावर जोरदार टीका केली. तसंच निवडणुकीला सामोरे जाण्याचा आव्हान केलं. यानंतर त्यांची यात्रा आमदार दीपक केसरकरांच्या सावंतवाडी मतदारसंघात आली. या सभेदरम्यान खासदार विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांवर टीकेचा बाण सोडला. "उद्धव ठाकरेंची सभा मागच्या वेळी झाली नसती तर केसरकरांचं विसर्जन त्याचवेळी झालं असतं. शिवसेनेत आले त्यांनी आधार दिला. त्यांना मदत केली म्हणून उद्धव ठाकरेंनी वैभव नाईक, राजन साळवींसारखा कार्यकर्ता असतानाही केसरकरांना मंत्रिपद दिलं, लाड पुरवले. परंतु या पवित्र भूमीत असे गद्दार निर्माण झाले हे दुर्देव आहे," असं म्हणत राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. आता, राऊत यांच्या टिकेला केसरकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

विनायक राऊतांचं नेमकं शिक्षण मला माहिती नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण हे फारसं चांगलं नाही. पण, ते जर असे बोलत असतील तर चुकीच्या माणसाला मी खासदार म्हणून निवडून आणलं असं मी समजेल. कारण, मी जो लढा दिला, त्यामुळेच विनायक राऊत निवडून आले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. यांना कोकणात कसं ट्रीट केलं जात हे मला माहिती आहे. राजकारण हाच त्यांचा धंदा आहे. रेडी नावाचं एक पोर्ट आहे, ते त्यांचे भाच्चे चालवतात, त्यातून एकही रुपया खर्च न करता 300 कोटी रुपयांचा फायदा त्याला झाला. राजकारण हा यांचा धंदा बनलाय, यांना निष्ठा वगैरे काही नाही. म्हणून, एका राऊतांनी अर्धी शिवसेना संपवली, उरलेली शिवसेना संपविण्यासाठी दुसरे राऊत पुरेसे आहेत, असं माझं मत आहे, असेही केसरकर यांनी म्हटले. 

काय म्हणाले होते विनायक राऊत 

"चार घरांची चव चाखून आलेले शिवसेनेला शहाणपणा शिकवायला निघालेत. हिंदुत्वावर आता हे पोपट बोलायला लागले. ज्या सावंतवाडीकरांनी बोट पकडून राजकारणात आणलं त्या दिलीप नार्वेकरांना फेकून दिलं. शरद पवारांनी त्यांना आधार दिला त्यांच्या तोंडालाही केसरकरांनी पानं पुसली. ज्या शरद पवारांवर आरोप केले त्यांच्याबद्दल शब्द तोंडातून निघतात कसे?," असा सवाल विनायक राऊत यांनी केला होता. "ज्या पद्धतीनं तुम्हाला उभं केलं, मंत्रिपदासाठी शिंदे गटात गेला, परंतु आईवडिलांची शपथ घेऊन सांगा, तुम्ही गद्दारी केली तुम्हाला शिवसेनेचं नाव घेण्याचा अधिकार नाही," असंही ते म्हणाले. आम्हाला संजय राऊतांचा अभिमान असून शिवसेनेचा नेता असावा तो संजय राऊतांसारखाच असं वक्तव्यही त्यांनी केलं.

टॅग्स :दीपक केसरकर शिवसेनामुंबईविनायक राऊत संजय राऊत