Join us  

Shivsena: एकनाथ शिंदेंचे 'बाहुबली' बॅनर झळकले, फ्लेक्सवर बाळासाहेबही दिसले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 12:11 PM

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी टाकलेला डाव यशस्वी होताना दिसत आहे

ठाणे/मुंबई- महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. विरोधी पक्ष भाजपाने विशेष अधिवेशनाची केलेली मागणी राज्यपालांनी आज मान्य केली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानभवन सचिवालयाला पत्र लिहून उद्याच म्हणजेच ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. एकीकडे सत्तातंराच्या घडामोडींना वेग आला असतानाच दुसरीकडे कार्यकर्ते आणि नागरिकांनाही याची उत्कंठा आहे. शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे यांचं ठाण्यात जोरदार समर्थन होत आहे. 

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी टाकलेला डाव यशस्वी होताना दिसत आहे. गेल्या 8 दिवसांपासून गुवाहाटीत जवळपास 50 आमदारासंह त्यांचा मुक्काम असून आता ते उद्या म्हणजेच 30 जून रोजी मुंबईत येत असल्याचे समजते. एकीकडे त्यांना शिवसेनेतील काही नेत्यांकडून विरोध होत असतानाच ठाण्यात त्यांचे बाहुबली रूपातील डिजिटल बॅनर झलकले आहेत. सध्या या बॅनरची मुंबईसह ठाणे जिल्ह्यात आणि सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

एकनाथ शिंदेंचं समर्थन करण्यासाठी ठाण्यात एकीकडे शक्तिप्रदर्शन होत असताना दुसरीकडे शिवसेना दक्षिण भारतीय विभागाने एकनाथ शिंदे यांना थेट बाहुबली अशी पदवी देत बाहुबलीच्या स्वरूपात त्यांचे मोठे बॅनर उभारले आहे. या बॅनरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे बाहुबली असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता हे बॅनर सर्वांचे लक्षं वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे या बॅनरवर एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो दिसून येत आहे. तर, एकनाथ शिंदेंच्या छातीवर आनंद दिघेंचा फोटो दिसतो. मात्र, उद्धव ठाकरे यांचा फोटो कुठेही दिसत नाही. एकनाथ शिंदे यांचे बाहुबली स्वरूपात उभारण्यात आलेल्या या बॅनरवर विजयी भव: असा आशयही लिहिण्यात आला आहे.

शिंदेंनी कामाख्या देवीचं घेतलं दर्शन

महाराष्ट्रातील जनतेला सुख समाधान आणि समृद्धीचे दिवस येवोत यासाठी आम्ही कामाख्या देवीकडे मागणं मागितलं आहे. कामाख्या देवीचे दर्शन हे श्रद्धेचा विषय आहे. आपलं मागणं घेऊन सर्वच जण कामाख्या देवीकडे येतात आणि देवी त्यांना आशीर्वाद देतात. आता आम्ही उद्या सर्व आमदारांना घेऊन फ्लोअर टेस्ट साठी जाणार आहोत आणि जी कोणतीही प्रक्रिया पार पाडायची असेल, त्या पद्धतीची पूर्तता पार पाडण्यासाठी आम्ही उद्याच मुंबईत जाणार आहोत, असे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाठाणेउद्धव ठाकरे