Join us
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एक ठाकरे राजकारणात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 12:07 IST

'सामना'तील त्या जाहिरातीवरून तर्कवितर्कांना उधाण.

मुंबई: मुंबई विद्यापीठ अधिसभेच्या (सिनेट) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर ठाकरे घराण्यातील आणखी एक व्यक्ती राजकारणात प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ही निवडणूक जिंकल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये अभिनंदनाची जाहिरात देण्यात आली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आणि आदित्य यांचे बंधू तेजस ठाकरे यांचेही छायाचित्र दिसत आहे. त्यामुळे आता तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एरवी तेजस ठाकरे अधूनमधून शिवसेनेच्या जाहीर कार्यक्रमांमध्ये व्यासपीठावर दिसले असले तरी त्यांनी आतापर्यंत राजकारणापासून दूरच राहणे पसंत केले होते. राजकारणापेक्षा त्यांचा ओढा, जंगल, झाडे आणि वन्य प्राण्यांचा अभ्यासाकडे जास्त असल्याचे बोलले जाते. परंतु, 'सामना'तील जाहिरात पाहता आता तेजस ठाकरे राजकारणाच्या प्रांतात उतरणार असल्याचे कळते. सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांना संघटनेतील राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा पक्षनेतृत्त्वाचा मानस आहे. काल निवडणूक जिंकल्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही विधानसभेतही आत्तापेक्षा दुप्पट जागा मिळतील, असे विधान केले होते. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत आदित्य यांना संघटनेच्या मुख्य प्रवाहात आणले जाईल. त्यानंतर युवा सेनेची सूत्रे तेजस यांच्याकडे  देण्यात येतील, अशी चर्चा आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरेही गेल्या काही काळापासून मनसेच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसत आहे. अलीकडे ते पक्षाच्या अनेक जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. 

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेआदित्य ठाकरेराज ठाकरे