Join us  

कश्मीरात तिरंगा फडकवणे हा गुन्हा ठरत असेल तर तेथे आमची राजवट आहे हे कसे स्वीकारायचे? - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2017 7:55 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजपावर निशाणा

मुंबई - नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावून दाखवावा, असे आव्हान केंद्र सरकारला दिले होते. त्यांचे हे आव्हान शिवसेनेनं स्वीकारत बुधवारी (6 डिसेंबर) श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांच्या या प्रयत्नाचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून कौतुक केले आहे. तर दुसरीकडे त्यांनी ''साऱ्या देशात तिरंगा फडकत असताना कश्मीरात तिरंगा फडकवणे हा गुन्हा ठरत असेल तर तेथे आमची राजवट आहे हे कसे स्वीकारायचे?'', असा प्रश्नदेखील उपस्थित केला आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय?कश्मीरच्या लाल चौकात अखेर ‘वंदे मातरम्’चा जयजयकार झाला. भारतमातेच्या विजयी घोषणा झाल्या व तिरंगा राष्ट्रध्वजही फडकवला. हे शौर्य अखेर आमच्या बेडर राष्ट्राभिमानी, ५६ इंच छातीच्या शिवसैनिकांनी बजावले. भारतमातेचा जय म्हणायला हिंदुस्थानातच बंदी असेल तर ती भूमी स्वतंत्र झाली असे मानायला आम्ही तयार नाही. साऱ्या देशात तिरंगा फडकत असताना कश्मीरात तिरंगा फडकवणे हा गुन्हा ठरत असेल तर तेथे आमची राजवट आहे हे कसे स्वीकारायचे? पण जम्मूच्या आठ-नऊ शिवसैनिकांनी लाल चौकात जाऊन तिरंगा फडकवला आहे. ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या आरोळ्या ठोकणाऱ्यांचे आव्हान स्वीकारून हे शौर्य या तरुण पोरांनी गाजवले. हिंदुस्थानचे पंतप्रधान मोदी यांनी निवडणुकीपूर्वी प्रचार सभांतून जोरदार गर्जना केल्या होत्या की, पाकव्याप्त कश्मीर आम्ही हिंदुस्थानात आणू. तसे काहीच घडले नाही. यावर आता फारुख अब्दुल्ला यांनी मोदींनाच आव्हान दिले. पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानात आणायच्या गर्जना कशाला करताय? त्याआधी श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा. आम्हाला वाटले हे आव्हान कश्मीर सरकारातील ‘भाजप’चे मंत्री स्वीकारतील व तिरमिरीत जाऊन लाल चौकात तिरंगा फडकवून अब्दुल्लांचे दात घशात घालतील! पण मेहबुबा सरकारातील भाजप मंत्र्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे सात शिवसैनिकांनी अखेर लाल चौकात तिरंगा फडकवून अब्दुल्लांचे आव्हान मोडून काढले. जम्मू-कश्मीरवर हिंदुस्थानचीच मालकी आहे, पण फक्त सैन्यबळावर कश्मीर आमच्या नकाशावर आहे. कधी पाकिस्तानातून आम्हाला आव्हान दिले जाते, तर कधी अब्दुल्लासारख्यांचे शेपूट वळवळू लागते. सैनिकांवरचे हल्ले व त्यांचे बलिदान सुरूच आहे. कश्मिरी पंडितांची घरवापसीदेखील मागील तीन वर्षांत होऊ शकलेली नाही. बंदुकांच्या गराड्यात तेथे स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागतो. श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवणे हे जणू महाकठीण काम होऊन बसले होते, पण ज्या शिवसैनिकांनी अयोध्येत बाबरीचा कलंक पुसून काढला त्याच शिवसैनिकांच्या उसळत्या रक्ताने व तप्त मनगटांनी श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रभक्तीचा यज्ञकुंड चेतवून तिरंगा फडकवला आहे! भारतमाता की जय!! 

टॅग्स :उद्धव ठाकरेभाजपाशिवसेनाजम्मू-काश्मीरफारुख अब्दुल्ला