मनोहर कुंभेजकर, मुंबई-छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ तेजस्वी पुतळा, पालखी, वारकर्यांच्या मंगलमय भजनासह दानपट्टा, ढाल-तलवार, लाठीकाठी, चौरंग चक्र असे शिवकालीन प्रेरणादायी साहसी खेळ आणि भगव्या टोप्या, भगवी वस्त्रे परिधान केलेल्या शिवभक्तांमुळे आज फोर्ट परिसरात अक्षरश: शिवशाहीच अवतरली.
निमित्त होते स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित भव्य शिवराय संचलनाचे. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी ‘स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने दरवर्षी भव्य ‘शिवराय संचलन' सोहळा आयोजित करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर यावर्षीही मोठ्या उत्साहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भारतीय रिझर्व बँक, अमर बिल्डिंग, फोर्ट मुंबई येथून शिवराय संचलनाची सुरुवात झाली. ढोलताशाचा गजर, नाशिक बाजा, लेझीमचा ताल, तुतारीचा निनाद, संबळ आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी या सोहळ्याची सुरुवात झाली.
यावेळी संचलन कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे सेनेवर तोफ डागली.आपण जसे शिवप्रेरणा घेऊन शिवसेनेची स्थापना केली. तसेच एका निष्ठेची परंपरा, जवळपास ४९ वर्ष म्हणजेच तीन पिढ्या कायम ठेवून त्याच मार्गाने पुढे जात आहोत.
ते म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन १९६६ मध्ये हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपले दैवत आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेणारे आपण त्यांचे शिवसैनिक आहोत. पण प्रत्येक काळातलं आणि प्रत्येक युगातील एक युद्ध असतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज पुन्हा जन्माला येणं अशक्य आहे.
मराठी भाषेबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ नेते भैयाजी जोशी यांनीं मराठी भाषेविषयी गरळ ओकली होती. त्यांना म्हणा, हातामध्ये भगवा घेतलेले हे मावळे आहेत, हे जिवंत आहेत. यामुळे महाराष्ट्राचा संस्कार, शिवरायांची परंपरा, त्यांचा वारसा, मराठी भाषा संपवण्याचा कोणी कितीही प्रयत्न केला तरी, तुमच्या अनाजी पंतांच्या कितीही पिढ्या जन्माला आल्या तरी, त्यांना हे शक्य होणार नाही असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष खासदार अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत,महासंघ कार्याध्यक्ष विलास पोतनीस, सरचिटणीस प्रदीप मयेकर, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, आमदार अनिल परब, आमदार सुनिल शिंदे, आमदार महेश शिंदे, माजी आमदार विशाखा राऊत, विभागप्रमुख आशीष चेंबुरकर, संतोष शिंदे,उदेश पाटेकर, प्रमोद शिंदे, यांच्यासह स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाशी संलग्न असलेल्या सर्व समित्यांच्या आस्थापनांमधील कर्मचारी-भगिनी, शिवसेनेचे सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी-कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेट वे ऑफ इंडियाजवळ शिवरायांना अभिवादन
-संचलनात या मार्गावरील हुतात्मा स्मारकास मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. शिवराय संचलनाचा समारोप गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.