Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवनेरीच्या तिकीट दरात कपात; दादर-पुणे स्टेशन तिकीट आता ४४० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 14:24 IST

मागील काही काळात मुंबई-पुणे  मार्गावर कमी दरात चालणाऱ्या ओला,उबेर सारख्या टॅक्सी सेवेमुळे शिवनेरीच्या प्रवासी संख्येवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

मुंबई - मुंबई-पुणे मार्गावर धावणारी, एसटीची प्रतिष्ठीत सेवा म्हणून नावलौकीक असलेल्या शिवनेरी व अश्वमेध या बसेसच्या तिकीट दरात ८० ते १२० रुपयांपर्यंत भरगोस कपात करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. कमी झालेले नवे तिकीट दर येत्या सोमवार पासून, म्हणजे ८ जुलै पासून लागू होणार आहेत. 

गेली १५ वर्षे  मुंबई-पुणे मार्गावर अत्यंत लोकप्रिय असलेली एसटीची "शिवनेरी" ही बस सेवा प्रवाशांच्या सुविधेसाठी सज्ज आहे.  या मार्गावर किफायतशीर, सुरक्षित व आरामदायी सेवा म्हणून शिवनेरी बसकडे पाहिलं जातं. सध्या महाराष्ट्रातील  वेगवेगळ्या ७ मार्गावर शिवनेरीच्या दिवसभरात ४३५ फेऱ्या केल्या जातात, याद्वारे दरमहा सुमारे दीड लाख प्रवाशांना दर्जेदार सेवा दिली जात आहे. या प्रतिष्ठीत बस सेवेची लोकप्रियता लक्षात घेऊन, ही प्रतिष्ठीत सेवा सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त प्रवासी संख्या वाढवणे, हा तिकीट दर कमी करण्याचा उद्देश असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले. 

मागील काही काळात मुंबई-पुणे  मार्गावर कमी दरात चालणाऱ्या ओला,उबेर सारख्या टॅक्सी सेवेमुळे शिवनेरीच्या प्रवासी संख्येवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तिकीट दर कमी केल्यामुळे हा प्रवाशी वर्ग सुद्धा शिवनेरीकडे वळेल अशी आशा एसटी महामंडळाला आहे. टॅक्सीसेवेचे दर बसच्या तुलनेत कमी असल्याने ग्राहक एसटीच्या सेवेकडे पाठ फिरवत होता. 

एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने सध्या प्रवाशांना या मार्गावर उपलब्ध असलेल्या वाहतूक व्यवस्थेचा विचार करून स्पर्धात्मक तिकीट दर  कपातीचा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार लवचिक भाडेवाढ अथवा कपातीच्या संदर्भात एसटी महामंडळाला राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या विशेष अधिकारानुसार ही दर कपात करण्यात आली आहे. येत्या सोमवार पासून कमी झालेले नवीन तिकीट दर लागू होतील अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. एसटीने केलेली दरकपात प्रवाशांच्या फायदेशीर ठरेल असा अंदाज वर्तविला जात आहे. 

टॅग्स :एसटीदिवाकर रावते