Join us

होळीसाठी फुलं आणायला गेलेल्या तिघांना 'शिवेनरी'नं उडवलं, राष्ट्रवादी (श.प.) सोशल मीडिया सेलच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 14:02 IST

मुंबईच्या प्रभादेवी ब्रिजवर बुधवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास विरुद्ध दिशेनं देणाऱ्या शिवनेरी बसनं दुचाकीवरुन जाणाऱ्या तीन तरुणांना उडवलं.

मुंबई

मुंबईच्या प्रभादेवी ब्रिजवर बुधवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास विरुद्ध दिशेनं देणाऱ्या शिवनेरी बसनं दुचाकीवरुन जाणाऱ्या तीन तरुणांना उडवलं. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव प्रणय बोडके (२९) असून तो शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सोशल मीडिया विभागाचं काम पाहत होता. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे (श.प) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही दु:ख व्यक्त करत प्रणय याला श्रद्धांजली वाहिली आहे. 

प्रणय बोडके (२९), करण शिंदे (२९) आणि दुर्वेश गोरडे हे तिघे जण स्कूटरवरुन परळ येथून दादरला होळीसाठी फुलं आणण्यासाठी जात होते. यावेळी विरुद्ध दिशेनं भरधाव वेगात येणाऱ्या शिवनेरी बसने त्यांच्या स्कूटरला धडक दिली. यात प्रणय बोडके याचा केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दुर्वेश आणि करण हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

इकबाल शेख असं शिवनेरी चालकाचं नाव असून अपघातानंतर तो पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला घटनास्थळाजवळ असलेल्या काही स्थानिकांनी पकडलं. आरोपीला भोईवाडा पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :मुंबईअपघात