बोगस लसीकरण प्रकरणात शिवम रुग्णालयाचा परवाना रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 09:23 IST2021-07-03T09:23:14+5:302021-07-03T09:23:35+5:30

हाॅस्पिटलही केले सील : मुंबई महापालिकेची कारवाई

Shivam Hospital license revoked in bogus vaccination case | बोगस लसीकरण प्रकरणात शिवम रुग्णालयाचा परवाना रद्द

बोगस लसीकरण प्रकरणात शिवम रुग्णालयाचा परवाना रद्द

ठळक मुद्देकांदिवलीतील हिरानंदानी हेरिटेज येथील लसीकरण घोटाळा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली.

मुंबई : बनावट लसीकरण रॅकेट उघड झाल्यानंतर मुंबईतील तब्बल २६०० लाभार्थींना लसीऐवजी ग्लुकोजचे पाणी देण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणात दोषी आढळलेल्या शिवम रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची सूचना मुंबई पोलिसांनी केली होती. त्यानुसार महापालिकेने शुक्रवारी या रुग्णालयाला सील केले आहे. तसेच अशा प्रकारांना चाप लावण्यासाठी सोसायट्यांमधील लसीकरणाबाबत सुधारित नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

कांदिवलीतील हिरानंदानी हेरिटेज येथील लसीकरण घोटाळा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली. अशाप्रकारे फसवणूक केल्याप्रकरणी बोरीवली, वर्सोवा, खार, भोईवाडा, बांगुरनगर पोलीस ठाण्यात एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीत लसींचा पुरवठा चारकोप येथील शिवम रुग्णालयातून केल्याचे समोर आले.

एकदा लसीकरण करून त्या रिकाम्या बाटलीत पुन्हा पाणी भरून किंवा ग्लुकोज भरून ते लसीकरणासाठी वापरले जात असल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे लसींच्या नावाखाली काय दिले? याबाबत अधिक तपास सुरू आहे. याप्रकरणी शिवम रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची कारवाई पालिका प्रशासनाने शुक्रवारी केली त्यानुसार हे रुग्णालय शुक्रवारी सील करण्यात आले, अशी माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

संबंधितांना लस देण्याबाबत पालिकेचा विचार
बोगस लसीकरण प्रकरणात लाभार्थींना देण्यात आलेली लस नेमकी काय होती? याबाबत पोलिसांकडून अहवाल आल्यानंतर संबंधितांची आरोग्य तपासणी केली जाईल. तसेच त्यांना देण्यात आलेले प्रमाणपत्र केंद्राकडून रद्द करण्याची कार्यवाही पालिकेला करावी लागणार आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तींना तपासून त्यांना पुन्हा लस देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

Web Title: Shivam Hospital license revoked in bogus vaccination case