शिवाजी पार्क, नरे पार्क : अवघ्या मुंबईची 'क्रीडा पंढरी'; सचिनसह अनेकांचे होम पिच, विविध खेळांचा सराव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:42 IST2025-12-15T12:41:41+5:302025-12-15T12:42:34+5:30
मुंबईतील उद्याने, मैदाने आणि मोकळ्या जागांचा न्हास होत असतानाही दादरचे शिवाजी पार्क आणि परळ येथील नरे पार्क यांची ओळख आजही मुंबईकरांची 'क्रीडा पंढरी' म्हणून कायम आहे.

शिवाजी पार्क, नरे पार्क : अवघ्या मुंबईची 'क्रीडा पंढरी'; सचिनसह अनेकांचे होम पिच, विविध खेळांचा सराव
सुजित महामुलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील उद्याने, मैदाने आणि मोकळ्या जागांचा न्हास होत असतानाही दादरचे शिवाजी पार्क आणि परळ येथील नरे पार्क यांची ओळख आजही मुंबईकरांची 'क्रीडा पंढरी' म्हणून कायम आहे. या मैदानांवर होणाऱ्या क्रीडा सामान्यांसह सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रम, सभा यांमुळे या मैदानांशी अनेकांची नाळ जोडली गेली आहे.
शिवाजी पार्क मैदानाने देशाला 'मध्य मुंबईतील हे मैदान अनेकांचा श्वासच आहे. उपनगरातही असे एखादे मैदान असते, तर लाखो मुलांना त्याचा फायदा झाला असता. सरकारने, याकडे लक्ष दिले, तर पुढची पिढी निरोगी घडेल, असे मत खेळाडू शैलेश पाटील याने व्यक्त केले.
सचिन तेंडुलकरसारखा 'भारतरत्न' दिला. १९८० च्या दशकात याच मैदानावर त्याने क्रिकेटचे धडे गिरवले. १९८३ च्या विश्वविजेत्या क्रिकेट संघातील संदीप पाटील यांच्यासह अनेक नामवंत क्रिकेटपटू इथे घडले. आजही या मैदानात महामुंबई परिसरातून मुले क्रिकेट खेळण्यासाठी येतात. टेनिस, फुटबॉल, मल्लखांब, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉलही येथे खेळले जातात.
अतिक्रमण होऊ नये, यासाठी रहिवासी जागरूक
नरे पार्कवर विविध खेळांचे सामने, स्पर्धा होतात. २०१३ मध्ये या मैदानात क्रीडासंकुल उभारण्याचा प्रस्ताव आला, तेव्हा स्थानिकांनी एकत्रित येत मैदान बचावासाठी लढा दिला, हे येथील सामुदायिक भावनेचे उदाहरण आहे. या मैदानात मुले क्रिकेट खेळत असल्याने बॉल लागू नये, यामुळे ज्येष्ठ नागरिक चालण्यासाठी येण्याचे प्रमाण कमी आहे. येथील बोरिंग मशिन बंद असल्याने मैदानात पाणी मारण्यात अडचण येते. सायंकाळी दिव्यांची कमतरता भासते. मैदानात अतिक्रमण होऊ नये, यासाठी रहिवासी नेहमीच जागरूक असतात, असे रहिवासी मिनार नाटळकर यांनी सांगितले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ, राजकीय सभांचा इतिहास
शिवाजी पार्क आणि नरे पार्क मैदानाला संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि राजकीय सभांचा इतिहास आहे. शिवाजी पार्क मैदान १.१३ लाख चौरस मीटर असून, बाहेरील कडेला दाट झाडांची रांग, मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आणि 'उद्यान गणेश' म्हणून ओळखले जाणारे छोटे गणेश मंदिर आहे. पालिकेच्या या मैदानावर ३१ भाडेकरू संस्था असून, उर्वरित परिसर सर्वसामान्यांसाठी खुला आहे.
नरे पार्क मैदानाचे क्षेत्र आठ हजार चौरस मीटर आहे. मैदान बचाव चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या मैदानासारख्या अनेक सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी २०१३ मध्ये प्रयत्न केले.