Join us  

भाजपा आमदार नितेश राणेंकडून शिवाजी महाराजांची तुलना 'या' ग्रीक राजाशी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 10:38 PM

जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहेत.

मुंबई - महाराष्ट्रात 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावरुन चांगलच वादंग सुरू आहे. त्यात, भाजपा नेते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाव न घेता टीका केली. उदयनराजेंच्या या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड व कामगारमंत्री नवाब मलिक यांनी नाव न घेताल उदयनराजेंना लक्ष्य केले. त्यानंतर, आता आमदार नितेश राणेंनी शिवाजी महाराजांची तुलना ग्रीक राजाशी केली आहे.  

जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे जाणता राजा उपमा देताना विचार करावा, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांचे नाव न घेता केली होती. तसेच, अनेकांना जाणता राजाची उपमा देतात, त्याचाही मी निषेध करतो. आता, कणकवली मतदारसंघाचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जगजेत्ता अलेक्झांडरशी केली आहे. 

या शिवाजीराजांचे शौर्य आणि कर्तृत्वएवढे मोठे आहे की, त्यांची तुलना जगजेत्त्या अलेक्झांडरशीच होऊ शकेल

असा आशयाचा एका फोटो नितेश यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यावरुन, छत्रपती शिवाजी महाराज हे जगजेत्ता असल्याचं राणेंनी सूचवलंय.  

दरम्यान, जाणता राजा उपमा देताना विचार करण्याची गरज असल्याचे उदयनराजेंनी म्हटले होते. उदयनराजेंच्या या टीकेचा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला. 'होय शरद पवार हे जाणता राजाच' असे ते म्हणाले. तर, जयभगवान गोयल भाषणात सांगतात, आता पुस्तक रिलीज होतंय. त्याची निंदा न करता, तुम्ही इतरांवर बोट दाखवताय. म्हणजे, स्पष्ट रुप पद्धतीने त्यांची लाचारी दिसून येते, असे म्हणत मलिक यांनी उदयनराजे भोसलेंवर नाव न घेता टीका केली. 

टॅग्स :नीतेश राणे मुंबईभाजपाछत्रपती शिवाजी महाराजउदयनराजे भोसले