Join us

“शिवसेनेचा मराठी प्रेमाचा बुरखा फाटला”; मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्यांना पालिकेत नोकरी देण्यास टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 06:04 IST

मराठीतून उत्तीर्ण शिक्षकांना इंग्रजी शाळेत प्राधान्य नाही; पालिकेच्या भूमिकेचा भाजपकडून विरोध 

मुंबई :  महापालिका २७ फेब्रुवारीपासून मराठी भाषा दिन पंधरवडा साजरा करीत असते. त्याचवेळी इयत्ता दहावी मराठी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या दीडशे शिक्षकांना पालिका शिक्षण विभागात रुजू करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा भाजपचा आरोप आहे. याचे तीव्र पडसाद शिक्षण समितीच्या बैठकीत सोमवारी उमटले. या शिक्षकांना तत्काळ सेवेत न घेतल्यास तीव्र विरोध करण्यात येईल, असा इशारा भाजप सदस्यांनी दिला. 

महापालिका शाळेत पवित्र पोर्टलवरून शिक्षक नियुक्तीसाठी परीक्षा घेतल्या जातात. मात्र, इयत्ता दहावी मराठी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या दीडशे शिक्षकांना शिक्षण विभागात रुजू करण्याबाबत टाळाटाळ केली जात होती. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण समितीच्या पटलावर चर्चेसाठी आला होता. यामध्ये या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाल्यामुळे इंग्रजी शाळेत त्यांची नेमणूक करता येणार नाही, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे या उमेदवारांचे शालेय शिक्षण वगळता इतर शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असल्याचे समोर आले. तरीही त्यांना शिक्षण विभागातील सेवेत तत्काळ रुजू न करून घेणे हा मराठी भाषेवर अन्याय असल्याची नाराजी भाजप सदस्यांनी व्यक्त केली. 

आधीच मराठी शाळांतील पटसंख्या कमी होत आहे. अशाप्रकारे राज्यकर्त्यांना मराठीचा विसर पडल्यास पालक मराठी शाळांमध्ये मुले पाठवणार नाहीत, अशी भीती भाजपचे सदस्य प्रतीक करपे यांनी व्यक्त केली. मुंबईतील मराठी भाषेच्या अधोगतीला उथळ मराठी प्रेम असलेली शिवसेना जबाबदार आहे. यातून सत्ताधाऱ्यांच्या मराठी प्रेमाचा बुरखा फाटल्याची टीका त्यांनी केली. दहावी मराठी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना तात्काळ सेवेत रुजू करून घ्यावे, अन्यथा भाजपच्यावतीने तीव्र विरोध करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी बैठकीत दिला.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाशिवसेनाभाजपा