छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देण्यास शिवसैनिकांचा कट्टर विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 13:09 IST2019-07-26T13:09:04+5:302019-07-26T13:09:27+5:30
माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देण्यास शिवसैनिकांनी कट्टर विरोध केला आहे.

छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देण्यास शिवसैनिकांचा कट्टर विरोध
- मनोहर कुंभेजकर
मुंबई- माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देण्यास शिवसैनिकांनी कट्टर विरोध केला आहे. आज सकाळपासून बोरिवली-दहिसर भागात भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देण्यावरून एक कट्टर शिवसैनिक म्हणून विरोध असल्याचे फलक लागले आहेत. सध्या हे लागलेले फलक बोरिवली व दहिसरकरांमध्ये चर्चेचा विषय बनला असून, रस्त्यावरून जाणारे येणारे नागरिक हा फलक आवर्जून वाचत असल्याचे चित्र आहे.
आदरणीय शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या लखोबा लोखंडेची शिवसेनेला गरजच नाही! ह्या "भुजात" "बळ"नसलेल्या गद्दाराला शिवसेनेत पुन्हा प्रवेश देण्याची पत्रताच नाही, एक कट्टर शिवसैनिक असे फलक बोरिवली व दहिसरमध्ये लागले आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष सचिन अहिर यांनी काल मातोश्रीत हातात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. तर छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा काल होती. मात्र छगन भुजबळ यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना याचे खंडन केल होतेे.