Join us  

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसेना साधणार शक्तिप्रदर्शनाची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 2:31 AM

कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून करणार अभिवादन

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेतर्फे रविवारी शक्तिप्रदर्शनाची संधी साधण्यात येणार आहे. राज्यातील भाजपच्या सत्तेचा मार्ग शिवसेनेने अडवून ठेवल्याने सत्तेच्या नाड्या शिवसेनेच्या हातात आल्या आहेत. मात्र अद्याप शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झालेला नसल्याने शिवसेना या स्मृतिदिनाच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करीत आपली ताकद दाखवण्याची संधी सोडणार नाही, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर राज्यभरातून शिवसैनिकांचा जथ्था रविवारी धडकणार आहे. राज्यातील सत्तेचा संघर्ष चिघळलेला असल्याने या वेळच्या स्मृतिदिनाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार, माजी मंत्री, पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाळासाहेबांना अभिवादन करणार आहेत. या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कणखर भूमिका घेऊन भाजपचा सत्तेचा मार्ग रोखला आहे. आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती विधिमंडळाची सदस्य झाली आहे. या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन करीत शिवसेनेने आपली ताकद दाखविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेला कमकुवत पक्ष समजणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी शिवसैनिकांनी पूर्ण ताकद पक्षाच्या मागे उभी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवून बाळासाहेबांना अभिवादन करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. शिवसेनेला त्यांचा मुख्यमंत्री १७ नोव्हेंबरपूर्वी बसविण्याचा प्रयत्न होता; मात्र राजकीय परिस्थितीत तो पूर्ण झालेला नसल्याने शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून संदेश पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांसाठी दैवत आहेत. त्यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी राज्याच्या किंबहुना देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवाजी पार्कला येत असतात. राज्यातील राजकीय परिस्थितीशी याचा काहीही संबंध नसून या वेळी शक्तिप्रदर्शन करण्यात येणार नाही. ही शक्तिप्रदर्शनाची वेळ नसून आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी नेहमीच शिवसैनिक उपस्थित राहतात. शिवसैनिक, आमदार, खासदार, माजी मंत्री, पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी उपस्थित राहत असतात. - आमदार अ‍ॅड. अनिल परब, विभागप्रमुख

टॅग्स :बाळासाहेब ठाकरेशिवसेनाभाजपा